
Devendra Fadnavis Cabinet Reshuffle On Card: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली दौऱ्यात फडणवीस यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नेते म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश आहे. एकीकडे फडणवीसांच्या भेटीगाठी सुरु असतानाच फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मोठा फेरबदल होणार की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. राज्यसभेचे खासदार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अशापद्धतीची शक्यता व्यक्त केली आहे.
रिमोट कंट्रोल अमित शाहांकडे
“मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचा आणि कोणाला काढायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तरी रिमोट कंट्रोल अमित शहा यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळात गोंधळाचे वातावरण सुरू आहे. मी काही दिवसापासून पाहत आहे. चार मंत्री जाणार आहेत,” असं म्हणत संजय राऊत यांनी थेट चार मंत्र्यांची नावं घेतली आहेत.
या चार मंत्र्यांना जावं लागणार, असा दावा
“कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट तसेच योगेश कदम आणि संजय राठोड यांना देखील जावं लागेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. “भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य, घोटाळे, पैशांच्या बॅग घेऊन बसणे हे ओझं फडणवीस यांना पेलवत नाही,” असा टोला राऊतांनी लगावला आहे. “देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ साफसफाईची गरज आहे,” असं राऊत म्हणाले.
माणिकराव कोकाटेंना कायम ठेवण्यावरुन टोला
माणिकराव कोकाटेंना खातं बदल करुन मंत्रिमंडळात कायम ठेवलं जाईल असा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता राऊत यांनी, “या सगळ्या अफवा आणि शक्यता आहेत. त्यांना काढावे लागेल. अजित पवार यांना देखील ही मान्य आहे का? अनेक नमुने तुम्ही मंत्रिमंडळात घेतले आहेत,” असं राऊत म्हणाले.
फडणवीस नाराज?
मुख्यमंत्री फडणवीस हे मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांबद्दल नाराज असून त्यांनी याबद्दल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कल्पना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. आता ही नाराजी फडणवीस केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहचवल्यानंतर पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गुलाबराव पाटलांच्या खात्यात घोटाळा झाल्याचा आरोप
“हर्षल पाटील आत्महत्या करतो. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले आहे. गुलाबराव पाटील यांच्या खात्यातील घोटाळा आहे. किती ठेकेदारांनी आत्महत्या केल्या? अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या. काय सांगतो गुलाबराव पाटील?” असा टोला राऊतांनी लगावला.
नितेश राणेंनी राजीनामा द्यावा, कारण…
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम मौलवी भेट घेतल्याच्या मुद्द्यावरुन फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील नितेश राणेंना राऊतांनी टोला लगावला. “नितेश राणे यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही राजीनामा द्या तरच तुम्ही खरे हिंदुत्ववादी,” असं राऊत म्हणाले. “या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाजप नव्हता, गांधी यांना खांदा लावून मुस्लिम लोक होते. अमर शेख सारखे लोक काम करत होते. मोहन भागवत यांच्या कार्याचे स्वागत केले पाहिजे. भागवत यांचे कार्य पाहून नितेश राणेंनी मंत्रिमंडळातील राजीनामा दिला पाहिजे. नितेश राणे वाटण्यासारखं उडत असतो,” असं राऊत म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.