
Khalid Ka Shivaji Cinema Controverversy: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा नुकताच वरळीत पार पडला. राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, २०२४ चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर 2024 चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना देण्यात आला. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत असताना 2 प्रेक्षकांनी घोषणाबाजी केली. यामुळे थोडावेळ कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला
मुख्यमंत्री भाषण करायला गेले आणि…
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडले. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला उभे असताना प्रेक्षागृहातून दोन इसम उभे राहिले आणि मोठमोठ्याने घोषणा देऊ लागले. या इसमांच्या हातामध्ये फलक होते. ‘बंद करा. बंद करा. इतिहासाचे विकृतीकरण बंद करा’ अशा घोषणा ते देत होते. यानंतर काही क्षणातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ‘आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेतलंय. कार्यक्रम खराब करु नका.’ या दोन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
काय आहे नेमकं प्रकरण?
‘खालिद का शिवाजी’ बंद करा अशी घोषणाबाजी 2 इसमांनी केली. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. पण सिनेमा प्रदर्शनाआधीच वादात सापडलाय. चित्रपट महोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोरच घोषणाबाजी केल्याने या सिनेमाची पुन्हा चर्चा झाली.
ते कोणत्या संघटनेचे?
घोषणा देणारे ते दोघे कोणत्या संघटनेचे होते? याची माहिती समोर आली नाही असे असले तरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय.
‘खालिद का शिवाजी’ला कोणाचा विरोध?
मराठी चित्रपट ‘खालिद का शिवाजी’ येत्या 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सकल हिंदू समाज आणि हिंदू जनजागृती समिती यांसारख्या हिंदू संघटनांनी या चित्रपटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवणे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला आहे. या वादामुळे मुंबई पोलिसांनी सकल हिंदू समाजाच्या व्हॉट्सअॅप गटाच्या प्रशासकाला नोटीस बजावली आहे, ज्यामुळे हा वाद आणखी तीव्र झाला आहे.
वादाचे कारण काय?
‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित काही दाव्यांवरून वाद निर्माण झाला आहे. हिंदू संघटनांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात खालील बाबी चुकीच्या पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत: 35% सैन्य मुस्लिम होते: चित्रपटात दाखवले आहे की, शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम सैनिक होते. शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर मशीद बांधल्याचा दावा. यात करण्यात आल्याचा आरोप आहे. शिवाजी महाराजांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते, असा उल्लेख, असल्याचा ठपकादेखील ठेवण्यात आलाय.
हिंदू जनजागृती समितीचं म्हणणं काय?
हिंदू जनजागृती समितीने या दाव्यांना ऐतिहासिक आधार नसलेले आणि खोटे ठरवत चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे. त्यांचा असा दावा आहे की, शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले, आणि त्यांना धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) दाखवणे हे इतिहासाचे विकृतीकरण आहे.या संघटनेने चित्रपटात खोटा इतिहास दाखवून हिंदूंच्या मनात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आंदोलनाची हाक दिली, ज्यामुळे मुंबई पोलिसांना नोटीस जारी करावी लागली. या संघटनेने चित्रपटातील दावे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आणि धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ‘पद्मावत’ आणि ‘जोधा अकबर’ यांसारख्या चित्रपटांना झालेल्या विरोधाचा दाखला देत ‘खालिद का शिवाजी’वर बंदीची मागणी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.