
MSRTC Helpline Number For Students: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बससेवेवर अवलंबून असलेल्या लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 1800221251 मोठा आधार ठरत आहे. विद्यार्थ्यांची सोय आणि सुरक्षितता हा उदात्त हेतू ठेवून सुरू केलेल्या या हेल्पलाईनवर, अवघ्या काही दिवसांत (आठवड्यात) तब्बल 308 तक्रारींची नोंद झाली आहे.
त्रुटी सुधारण्याची संधी
ही आकडेवारी तात्पुरती चिंता दर्शवत असली तरी, ती एसटी प्रशासनाला मूलभूत त्रुटी सुधारण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी आहे, असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.
प्रमुख तक्रारी कोणत्या?
नोंदवलेल्या तक्रारींमध्ये खालील गंभीर समस्या प्रामुख्याने समोर आल्या आहेत, ज्या आता थेट मंत्र्यांच्या निदर्शनाखाली असून त्यावर त्वरित कारवाई केली जात आहे.
वेळेवर बस न येणे: यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आता गांभीर्याने घेतले जात आहे.
बस थांब्यावर न थांबणे: नियोजित थांब्यांवरही बस थांबत नसल्याच्या तक्रारींवर तातडीने लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
पासधारकांना प्रवेश नाकारणे: लांब पल्ल्याच्या बसमध्ये पासधारक शालेय विद्यार्थ्यांना चढण्यास मनाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
मंत्र्यांचा कठोर निर्णय: जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
…तर थेट निलंबन
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी तात्काळ हेल्पलाईन सुरू करून विद्यार्थ्यांचे म्हणणे थेट प्रशासनापर्यंत पोहोचवले आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकांना निलंबित करण्याच्या कठोर सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ‘कामाला न जुमानल्यास कठोर कारवाई’ करण्याची मानसिकता निर्माण होऊन व्यवस्थेत सकारात्मक बदल होत आहेत.
पालक आणि विद्यार्थी आशावादी
एसटी महामंडळाने आता केवळ हेल्पलाईनवर तक्रारींची नोंद न घेता, या 308 तक्रारींचा आधार घेऊन मूलभूत कामकाजात आणि कर्मचारी मानसिकतेत त्वरित सकारात्मक सुधारणा कराव्यात, असे निर्देश सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी दूर करणे हे एसटी महामंडळाचे सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे. मंत्री महोदयांनी आता तक्रारींच्या ‘100% निराकरणावर’ लक्ष केंद्रित केल्यास, हा हेल्पलाईन क्रमांक केवळ ‘तक्रार पेटी’ न राहता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री देणारे ‘विश्वास केंद्र’ बनेल, असा विश्वास विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी व्यक्त केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



