
Final phone conversation between flight attendant Pinky Mali and her father: बारामतीमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांनी आपला जीव गमावला आहे. मृतांमध्ये फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचाही समावेश होता. मृत्यूआधी तिचं आपले वडील शिवकुमार माळी यांच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. मुंबईतील वरळीची रहिवासी असलेल्या पिंकीने तिच्या वडिलांना “पप्पा, मी अजित पवार यांच्यासोबत बारामतीला विमानाने जात आहे. त्यांना तिथे सोडून मी नांदेडला जाईन. आपण उद्या बोलू,” असं सांगितलं होतं.
शिवकुमार यांनी तिला उत्तर दिलं होतं की, काम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोलू. पण तो फोन कधीच आला नाही. “मी तिला म्हणालो होतो, आपण उद्या तुझ्या कामानंतर बोलू.’ पण तो उद्या कधीच येणार नाही,” अशी हतबलता तिने व्यक्त केली आहे.
त्यांनी सांगितलं की, ती अलीकडच्या अनेक दौऱ्यांमध्ये पवार यांच्यासोबत होती. दुःख अनावर झालेल्या शिवकुमार यांनी सांगितलं की, “मी माझी मुलगी गमावली आहे. नेमकं काय झालं हे मला माहीत नाही, कारण अशा घटनांबद्दल मला कोणतंही तांत्रिक ज्ञान नाही. मी पूर्णपणे खचलो आहे. मला फक्त माझ्या मुलीचा मृतदेह हवा आहे, जेणेकरून मी तिच्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार करू शकेन. माझी एवढीच इच्छा आहे”.
ही दुर्घटना बुधवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ घडली. यामध्ये दिल्लीस्थित व्हीएसआर व्हेंचर्सच्या VT-SSK नोंदणी असलेल्या ‘लिअरजेट ४५’ विमानाचा समावेश होता. विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, विमान परिचारिका पिंकी माळी, मुख्य वैमानिक सुमित कपूर आणि सह-वैमानिक शंभवी पाठक असे 5 जण होते.
माहितीनुसार, विमान सकाळी 8.10 वाजता मुंबईहून निघाले आणि सकाळी 8.45 च्या सुमारास रडारवरून नाहीसे झाले. सकाळी 8.46 ला ते कोसळले. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात चार सभांना संबोधित करण्यासाठी अजित पवार निघाले होते.
विमानाचे लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटल्यानंतर आपत्कालीन सेवा आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. बचाव पथकांना त्वरित पाचारण करण्यात आले. या घटनेची चौकशी करण्यासाठी विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) चे एक पथक बुधवारी दिल्लीहून पुण्याकडे रवाना झाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



