digital products downloads

बारामती पोटनिवडणूक बिनविरोधसाठी हालचालींना वेग: सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन; काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष – Pune News

बारामती पोटनिवडणूक बिनविरोधसाठी हालचालींना वेग:  सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन; काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष – Pune News



बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या संपणार आहे. अशातच राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा फोन करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे बारामतीचा हा रणसंग्राम ‘तुल्यबळ’ होणार की ‘बिनविरोध’, याचा फैसला आता काँग्रेसच्या दिल्लीतील ‘हाय कमांड’च्या निर्णयावर अवलंबून आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भावनिक ओलावा आणि राजकीय सौहार्द जपण्यासाठी महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार स्वतः रिंगणात आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवले आहे. या पार्श्वभूमीवर, सुनेत्रा पवारांनी सपकाळांशी चर्चा करून काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विनंती केली आहे. काँग्रेसची ‘वेट अँड वॉच’ भूमिका सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतर काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, बारामती पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय हा पक्षाच्या दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाचा आहे. त्यामुळे उमेदवारी मागे घ्यायची की नाही, यासाठी दिल्लीतील श्रेष्ठींशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, उद्या ९ एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष काँग्रेसच्या भूमिकेकडे लागले आहे. ‘वर्षा’वर खलबते; फडणवीसांकडून सुनेत्रा पवारांना पाठिंबा दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. सुमारे २० मिनिटे चाललेल्या या बैठकीत पोटनिवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. यावेळी “भाजप ‘मोठा भाऊ’ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील,” असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे निवडणुकीत भाजप सुनेत्रा पवारांना आवश्यक ती मदत करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामतीचा तिढा सुटणार का? दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. मात्र, शरद पवारांच्या पक्षाने या जागेवर उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी काँग्रेसने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. आता सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देऊन काँग्रेस ‘बॅकफूट’वर जाते की आकाश मोरे यांच्या माध्यमातून महायुतीला तगडे आव्हान देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बारामती पोटनिवडणुकीतून 6 उमेदवारांची माघार दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, आज दिवसभरात 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. विलास होळकर ,माऊली कांबळे, रजाक मुलाणी ,राहुल थोरात, अमोल कोकरे ,अशोक खामगळ यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. उद्या गुरुवार 9 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या किती जण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला 53 वैध अर्जांपैकी सहा जणांनी माघार घेतल्याने सध्या तरी 47 उमेदवार रिंगणात उरले आहेत. मात्र उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बारामतीत मोठ्या राजकीय हालचाली होण्याची आणि चित्र बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp