
Pankaja And Dhananjay Munde: राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंडे बंधू-भगिनी. राज्याच्या राजकारणात सक्रिय असणारे धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सक्रिय राजकारणातून अचानक गायब झालेत. तर दुसरीकडे 2019 विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे देखील राजकारणात जास्त सक्रिय दिसत नव्हत्या.. मात्र, त्याच पंकजा मुंडे आता राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्यायत. मुंडे बंधू-भगिनीचा राजकारणातील चढउतारासंदर्भात सविस्तर जाणून घेऊया.
राजकारण हा सापशिडीचा खेळ आहे.राजकारणात कोण अचानक चार घरं वर जातो. तर कोणी अचानक पहिल्या घरातून दहाव्या घरापर्यंत कोसळतो.माजी अन्न न नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना याचा पुरेपूर अनुभव आला असेल. अवघ्या सहा महिन्यापूर्वी धनंजय मुंडे हे राज्याच्या राजकारणातील पहिल्या फळीतील नेते होते. धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अगदी खास म्हणून मंत्रिमंडळात होते. जसे ते अजितदादांचे खास होते तेवढेच ते मित्रपक्ष असलेल्या भाजपलाही जवळचे होते. पण वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात आरोप झाले. त्यानंतर धनंजय मुंडेंचे दिवस फिरले. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
दोघांच्याही वाट्याला राजकीय वनवास
राज्याच्या राजकारणातूनही धनंजय मुंडे अचानक बाजूला फेकले गेलेत. धनंजय मुंडेंच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी हजेरी लावली होती. ते ज्या पंकजाताईंच्या शेजारी उभे होते त्यांच्या वाट्यालाही राजकीय वनवास आला होता. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर त्यांचं राजकारण अचानक दोलायमान झालं होतं. मंत्रिमंडळात असताना त्यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले. आज ज्या धनंजय मुंडेंसोबत पंकजा मुंडे उभ्या होत्या. त्याच धनंजय मुंडेंनी त्यांचा 2019ला विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. पंकजा मुंडेंनी त्यावेळी राज्यसभा मागितली. विधानपरिषदेची उमेदवारी मागितली पण त्यांच्याकडं पक्षनेतृत्वानं कानाडोळा केला होता. नाही म्हणायला त्यांना राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशच्या सहप्रभारी करण्यात आलं होतं.
राजकारणातील चढउतार सहन करु पण जनतेची साथ हवी
पंकजा मुंडे भाजपमध्ये दुर्लक्षित होतात की काय असं वाटत असताना 2024च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात टाकण्यात आली. पाठिशी धनंजय मुंडेंचं बळ असतानाही बीडच्या होमग्राऊंडवर पंकजा मुंडेंचा दारुण पराभव झाला. पंकजा मुंडेंचं राजकीय भवितव्यावर भलंमोठं प्रश्नचिन्हं असताना भाजपनं त्यांना पुन्हा हात दिला. त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आलं. एवढंच नव्हे तर मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना पर्यावरणमंत्री म्हणून मानाचं पान दिलं. राजकारणातील चढउतार सहन करु पण जनतेची साथ हवी असं त्या आवर्जून सांगतात.
भावंडं एकत्र आली असली तरी दोघांचं राजकारण वेगवेगळं
पंकजा मुंडेंनी अनेक वर्ष जो राजकीय वनवास भोगला तोच राजकीय वनवास आता धनंजय मुंडेंच्या वाट्याला आलाय. काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे बीडच्या राजकारणात नेतृत्व करण्याच्या भूमिकेत होते. पण आज धनंजय मुंडेंची ती देहबोली दिसत नाही. पंकजा मुंडे आता बीडच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळू लागलंय. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ही भावंडं एकत्र आली असली तरी दोघांचं राजकारण वेगवेगळं होईल असं जाणकार सांगतात.
धनंजय मुंडे पुन्हा बीडच्या राजकारणात केंद्रस्थानी?
बीडच्या राजकारणाच्या सी-सॉवर धनंजय आणि पंकजा मुंडे स्वार आहेत. पंकजा मुंडे यांचं पारडं आता जड वाटत असलं तरी पुढच्या काळात धनंजय मुंडे पुन्हा बीडच्या राजकारणात केंद्रस्थानी दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात कोणतीही गोष्ट कायमची आणि शाश्वत नसते याचा पुरेपूर अनुभव आता दोघाही मुंडे भावंडांना आला असेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.