
Maharashtra Politics : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा चर्चेत आला आहे. अशातच याच बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात लक्षवेधी घडामोड ढगली आहे. 349 ग्रामस्थांनी सरपंचाला लोकशाहीची ताकद दाखवली आहे. जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला जनतेनंच एका झटक्यात घरी बसवले आहे.
बीडच्या काडीवडगाव येथील महिला सरपंचाला ग्रामस्थांनी घरचा रस्ता दाखवला आहे. जनतेतून निवडून आल्यानंतर देखील कसलेही विकास काम केले नसल्याने ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्याला तक्रार केली होती. त्याच तक्रारीची दखल घेत पंचायत समिती प्रशासनाने वडवणी तालुक्यातील काडीवडगाव येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन केले.
या ग्रामसभेला सर्वात जास्त महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या. यावेळी 349 ग्रामस्थांनी सरपंचाच्या विरोधात संमती दाखविली. त्यामुळे विद्यमान महिला सरपंच प्रभावती लक्ष्मण हातागळे यांना थेट अपात्र घोषित करण्यात आले. विशेष ग्रामसभा घेऊन सर्वानुमते सरपंच अपात्र करण्याची राज्यातली दुसरी घटना असावी. विकासाची अपेक्षा ठेवून निवडून दिलेल्या महिला सरपंचाकडून विकासकामाला खीळ बसल्याने जनतेनेच अपात्र केल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
यापूर्वी एप्रिल 2025 मध्ये परभणीच्या सेलू तालुक्यातील कुपटा ग्रामपंचायतीत थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच बाईंना पायउतार व्हावं लागलं. जनतेची काम होत नसल्याने नाराज झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच रुख्मिणीबाई गवळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला होता. बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झालाय. विशेष ग्रामसभेत झालेल्या मतदानात 403 उपस्थितांपैकी 351 मतदारांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केले. तर 17 नागरिकांनी ठरावाविरोधात मते दिली. 35 जणांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मतदार ही ग्राम पंचायत सदस्यांच्या बाजूने वळले आणि गवळे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.