
बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये यंदा अचानक केस गळणे, टक्कल पडणे आणि बोटांची नखे गळून जाणे यांसारख्या गूढ आजारांचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला खामगाव आणि शेगाव तालुक्यांत दिसून आलेला हा आजार आता चिखली आणि मेहकरसारख्या घाटमाथ्याच्या भागांतही पसरत आह
.
बाधित नागरिकांची सखोल वैद्यकीय तपासणी
मेहकर तालुक्यात आता हाताला भेगा पडण्याच्या आजाराची नवीन लक्षणे समोर आली आहेत. विशेषतः शेलगाव देशमुख या गावातील सुमारे 20 ग्रामस्थांनी अशा प्रकाराच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे नोंदवल्या आहेत. हा प्रकार केंद्रीय आरोग्य व आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृह मतदारसंघातील गावात आढळून आल्याने आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने शेलगाव देशमुख येथे भेट देत बाधित नागरिकांची सखोल वैद्यकीय तपासणी केली आहे.
नेमका आजार कोणता?
आरोग्य पथकाने केलेल्या तपासणीत एकूण 20 रुग्णांची वैद्यकीय पाहणी करण्यात आली. त्यापैकी बहुतांश रुग्णांमध्ये इसबगोल (एक्झेमा, पाल्मोप्लांटर केराटोडर्मा किंवा पाल्मोप्लांटर सोरायसिस) या प्रकारच्या त्वचा विकारांची लक्षणे आढळून आली आहेत. हे रुग्ण मागील 12 महिने ते 5 वर्षांपासून या आजाराने त्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी बहुतेक रुग्णांवर बुलढाणा आणि अकोला येथील त्वचारोग तज्ज्ञांकडून मागील 1 ते 2 वर्षांपासून उपचार सुरू असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या त्वचाविकाराचा पाण्याशी कोणताही संबंध नसून, तो संसर्गजन्यही नाही. हा विकार मुख्यतः शरीरातील स्वयंप्रतिकारक प्रणालीच्या कारणाने उद्भवतो, जेव्हा शरीर विशिष्ट प्रतिजन किंवा हानिकारक रसायनांच्या संपर्कात येते. तपासणीनंतर सर्व रुग्णांना तसेच स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना या आजाराबाबतची सविस्तर माहिती, योग्य उपचार पद्धती आणि आवश्यक काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या डिसेंबरपासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अचानक केस गळण्याच्या प्रकारांनी नागरिक हैराण झाले होते. केस गळल्यानंतर काही रुग्णांच्या नखांना विद्रूप स्वरूप येऊ लागले आणि ती कमजोर होऊन गळून पडू लागली. अनेक रुग्णांमध्ये नखे पूर्णपणे गळून गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते.
यासोबतच रुग्णांमध्ये तीव्र थकवा आणि चिडचिडेपणाही दिसून येत होता. या सगळ्या प्रकारानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (ICMR) पथकाने संबंधित भागाचा दौरा करून विविध नमुने तपासणीसाठी गोळा केले होते. मात्र, या प्रकरणाचा अहवाल अद्याप लालफीतशाहीत अडकलेला असून, तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.