
Gautami Patil To The Point : महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. गौतमीचा स्टेज शो असो वा म्युजिक व्हिडीओ त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. अशातच गौतमी पाटील हिची झी २४ तासच्या टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत गौतमीने तिचं अत्यंत बिकट परिस्थितीत गेलेल्या बालपणापासून ते मनोरंजन सृष्टीपर्यंतचा तिचा प्रवास उलगडला. प्रत्येक प्रश्नावर गौतमीने दिलखुलासपणे उत्तर दिली. अशातच मध्यंतरीच्या काळात गौतमी पाटीलने एका कार्यक्रमात बैलासमोर नृत्य केल्याने ती चर्चेत आली होती. या सगळ्याबाबत तिने टू द पॉईंट मुलाखतीत सांगितलं आहे.
बैलासमोर गौतमी पाटील का नाचली होती?
झी 24 तासच्या टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या विशेष कार्यक्रमात गौतमी पाटीलला तिने बैलासमोर केलेल्या नृत्याबाबत आणि त्यानंतर झालेल्या ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा गौतमी म्हणाली की, ‘प्रत्येकाची हौस असते. कोणाला कशात आनंद मिळतो हे प्रत्येकाचे विचार आहेत. त्यांनी कार्यक्रम ठेवला आणि त्यांनी मला बोलावलं तर मी तिथे का नाही जाणार? माझा कार्यक्रम ठेवला तर मी का नाही म्हणणार. त्यामुळे मी गेले आणि कार्यक्रम केला. तसेच त्या कार्यक्रमाला फक्त बैलच नाही तर प्रेक्षक सुद्धा भरभरून होते. बैलासाठी कार्यक्रम होता पण प्रेक्षक सुद्धा होते. त्यांनी भरभरून प्रेम दिलं आणि खूप छान कार्यक्रम झाला. त्यानंतर मला झालेलं ट्रोलिंग पाहून अजित पवारांनी त्यावेळी माझी बाजू घेतली होती’.
दादांनी माझ्यासाठी जे केलं ते मी कधीच विसरणार नाही :
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी नृत्यांगना गौतमी पाटील हिची एक कलाकार म्हणून बाजू घेतली होती. मुलाखतीदरम्यान अजित दादांच्या त्यावेळी घेतलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ देखील दाखवण्यात आला. त्यावर गौतमी म्हणाली की, ‘अजित दादा एकदम बरोबर बोलले. अजित दादांना मी कधीच भेटले नाही आणि बोलले देखील नाही. पण अजित दादांनी केलेला सपोर्ट कलाकारांकरता खूप महत्वाचा आहे. आणि त्यावेळी हा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. अजित दादां माझ्यासाठी बोललेले ते शब्द खूप महत्वाचे होते. त्यांनी मला त्याक्षणी कलाकार म्हणून जो पाठिंबा दिला तेव्हा खूप छान वाटलं. दादांनी त्यावेळी माझं मन जिंकल्या सारखं झालं. दादांनी मलाच नाही तर प्रत्येक कलाकाराला सपोर्ट केलाय. त्यामुळे नकळत दादांनी माझ्यासाठी त्यावेळी जे केलं ते मी कधीच विसरणार नाही’.
अजित पवारांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला :
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. अजित दादांच्या निधनाबाबत बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, ‘मी झोपेतून उठले आणि मला अजित दादांच्या निधनाची बातमी समजली आणि माझी झोपच उडाली, मला विश्वास बसत नव्हता. अजित दादा कामाला प्रामाणिक होते. असा नेता होणे नाही आणि त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. अजूनही मला दादा गेले यावर विश्वास बसत नाही, दादा आपल्यातच आहेत असं वाटतं’.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



