
Labour Day 2025: 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस साजरा केला जातो. याच दिवशी कामगार दिवसही साजरा केला जातो. पण तुम्हाला माहितीये का कामगारांना रविवारची सुट्टी ही एका मराठी माणसामुळं मिळाली आहे. त्यांनी तब्बल 7 वर्ष रविवारच्या सुट्टीसाठी लढा दिला आणि अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आणि कामगारांना रविवारची सुट्टी मिळू लागली. कामगार दिनाच्या निमित्ताने आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ब्रिटिशांच्या काळात गिरणी कामगारांना सातही दिवस काम करावे लागत होते. आठवड्यात एकही दिवस सुट्टी मिळत नसे. तेव्हा कामगारांचे नेते नाराणय मेघाजी लोखंडे यांनी ब्रिटिशांसमोर रविवारच्या सुट्टीचा प्रस्ताव ठेवला. रविवारीच सुट्टी का असावी? याचे कारणही त्यांनी नमूद केले होते. रविवारी अनेक ब्रिटिश अधिकारी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात होते. मात्र भारतीयांचा असा कोणतीही परंपरा नव्हती. त्यानेळी कामगारांचे नेते नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल हॅण्ड्स असोसिएशन स्थापना केली. त्यांनी इंग्रजांसमोर साप्ताहिक सुट्टीचा प्रस्ताव ठेवला. आम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी सहा दिवस काम करतो. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी एक दिवस आम्हाला देशाची सेवा करण्यासाठी तसेच काही सामाजिक कामे करण्यासाठी मिळावा. तसेच रविवार खंडोबा या देवाचा वार असल्याने त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी मिळावी, असंही त्यांनी या प्रस्तावात नमूद केले होते.
मात्र नारायण लोखंडे यांचा रविवारच्या सुट्टीचा प्रस्ताव इतक्या सहजासहजी मंजुर झालाच नाही. 1884 मध्ये त्यांनी रविवारच्या सुट्टीसाठी संघर्ष करण्यात सुरूवात केली. तब्बल सात वर्ष त्यांनी आणि कामगारांनी लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो कामगारांनी मोर्चादेखील काढला. त्यांच्या आंदोलनामुळं अनेक कामगार पेटून उठले होते. लोखंडेंच्या आंदोलनाची अखेर मिल मालकांना दखल घ्यावीच लागली. मिल मालकांनी एकत्रित बैठक घेऊन रविवारच्या सार्वजनिक सुट्टीची मागणी मान्य केली. 10 जून 1890 रोजी कामगारांना रविवारची सार्वजनिक सुट्टी अखेर लागू करण्यात आली. त्याचबरोबर 8 तास काम हा ठरावदेखील मंजूर करुन घेण्यात आला.
कोण होते नारायण लोखंडे?
नारायण लोखंडे यांचे मुळ गाव कनेरसर ता खेड जिल्हा पुणे हे होते. त्यांचे वडील नोकरीनिमित्त ठाणे येथे गेले होते. तेव्हा ठाण्यातच 13 ऑगस्ट 1848 रोजी नारायणरावांचा जन्म झाला होता. शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाल्यानंतर ते मुंबईतील भायखळा येथे स्थायिक झाले. त्यांनी आधी रेल्वेत क्लार्क म्हणूनही नोकरी केली. त्यानंतर पोस्टात व गिरणीतही त्यांनी काम केले. 13 ऑगस्ट 1895 रोजी प्लेगच्या साथीने त्यांचे निधन झाले.
रविवारचीच सुट्टी का?
आठवड्याची सार्वजनिक सुट्टी रविवारीच का याचा कधी तुम्ही विचार केलाय का? ज्या ज्या देशांवर ब्रिटिशांनी राज्य केलेय त्या देशांमध्ये रविवारी हा सुट्टीचा दिवस असायचा. त्याला कारण म्हणजे बायबल आहे. बायबलनुसार, सहा दिवसांत देवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर देवाने सातव्या दिवशी विश्रांती घेतली असे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळं सहा दिवस काम केल्यानंतर सातव्या दिवशी सुट्टी घेतात. या दिवशी चर्चमध्ये सकाळी जाऊन प्रार्थना करतात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.