digital products downloads

ब्लॅक मार्केटमध्ये 7500 रुपयांत सिलिंडर: प्रकाश आंबेडकरांचा दावा; नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर? म्हणत PM नरेंद्र मोदींवर साधला निशाणा – Maharashtra News

ब्लॅक मार्केटमध्ये 7500 रुपयांत सिलिंडर:  प्रकाश आंबेडकरांचा दावा; नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर? म्हणत PM नरेंद्र मोदींवर साधला निशाणा – Maharashtra News



वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील इंधन टंचाई विशेषतः घरगुती गॅसच्या टंचाईवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काळ्या बाजारात गॅसचे एक सिलिंडर 7500 रुपयांत मिळत आहे. यामुळे मध्यम व गरीब कुटुंबाच्या चुली विझल्या आहेत, असे ते म्हणालेत. नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. प्रकाश आंबेडकर याविषयी आपल्या एका विस्तृत पोस्टमध्ये म्हणाले, नरेंदर (पीएम मोदी), कब मिलेगा सिलेंडर? देशात गॅस सिलिंडर्सचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. मध्यम आणि निम्न-उत्पन्न गटातील महिला, गृहिणी व कुटुंबांना केवळ गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहण्याची सक्ती केली जात आहे. एवढी त्रासदायक प्रतीक्षा करूनही, त्यांना अनेकदा सिलिंडर मिळवण्यात अपयशच येते. शिवाय, कुठे गॅस सिलिंडर उपलब्ध असेलच, तर तो केवळ काळ्या बाजारातच मिळतो. काळ्या बाजारात, सिलिंडर्स तब्बल 7,500 रुपयांना विकले जात आहेत. मध्यम आणि निम्न-उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी, त्यांच्या स्वयंपाकघरातील गॅसची चूल आता थंड पडली आहे. लग्नसोहळे अनिश्चित काळापर्यंत लांबणीवर आंबेडकर म्हणाले, गॅस सिलिंडर्सच्या तीव्र टंचाईमुळे, लहान रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील धाबे व चहा-नाश्त्याची दुकाने एकतर पूर्णपणे बंद पडली आहेत, किंवा कोळशाच्या चुलीवर स्वयंपाक करून तग धरण्याचा प्रयत्न करत आहेत. वसतिगृहे आणि ‘पेइंग गेस्ट’ निवासांमधील मेसपासून ते विवाहसोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांसाठीच्या केटरिंग सेवांपर्यंत सर्वत्र या सिलिंडर टंचाईचा परिणाम जाणवत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, अनेक मेस सेवा बंद पडल्या आहेत आणि अनेक विवाहसोहळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. 28 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे सदस्य 75 वर्षीय माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचे गॅस सिलिंडरच्या थकवणाऱ्या रांगेत उभे असताना निधन झाले. ज्या वयात त्यांनी घरी आराम करणे अपेक्षित होते, त्या वयात त्यांना केवळ गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी एका लांबलचक रांगेत उभे राहण्याची सक्ती झाली. गॅस सिलिंडरचा तुटवडा आता केवळ मध्यमवर्ग आणि गरिबांवरील एक आर्थिक बोजा राहिला नाही, तर तो आता ‘जीवन-मरणाचा’ प्रश्न बनला आहे, असे शंकरराव शिरसाट यांच्या निधनामुळे अधोरेखित होते. वंचितचे 6 एप्रिल रोजी राज्यव्यापी आंदोलन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी 6 एप्रिल रोजी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचीही घोषणा केली. ते म्हणाले, सरकार वारंवार असा दावा करते की, कोणताही तुटवडा, टंचाई किंवा संकट नाही. पण सत्य परिस्थिती सर्वांनाच ठाऊक आहे. परिस्थिती खरोखरच ‘सामान्य’ असेल, तर मग याचे उत्तर द्या, जनता अजूनही सिलिंडर्ससाठी रांगेत का उभी आहे? लोकांचा जीव का जात आहे? वंचित बहुजन आघाडी 6 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन छेडून नरेंदर कब मिलेगा सिलेंडर? हा प्रश्न विचारेल. आमचे हे आंदोलन जनतेच्या वेदना व मोदींच्या उत्तरदायित्वाचा आवाज बनेल, असे आंबेडकर म्हणाले. नाना पटोलेंचाही सरकारवर निशाणा दुसरीकडे, काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही गॅस दरवाढीवरून सरकावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात झालेली वाढ ही सर्वसामान्य नागरिक आणि लघु व्यावसायिकांसाठी मोठा धक्का आहे. हॉटेल, ढाबे, केटरिंग व्यवसाय तसेच छोट्या उद्योगांवर याचा परिणाम होणार असून त्यांच्या खर्चात वाढ होईल. परिणामी, या दरवाढीचा भार शेवटी सामान्य ग्राहकांवरच पडणार आहे. संसदेत उत्तर देताना सरकारने देशात गॅसचा कुठलाही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले होते; परंतु दरवाढ करून सरकारने स्वतःच्या वक्तव्यालाच छेद दिला आहे. जर गॅसचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल, तर दरवाढीमागचे नेमके कारण काय, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. नवीन गॅस कनेक्शन 1 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ग्राहकांना वेबसाइट बंद असल्याचे सांगण्यात येत असून सरकारकडून अद्याप स्पष्ट आदेश मिळाले नसल्याची माहिती दिली जात आहे. यापूर्वी ग्रामीण भागात गॅस वितरणानंतर 25 दिवसांनी बुकिंग करता येत होती; मात्र आता ही मुदत 45 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यावरून सरकार गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येते, असे पटोले म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp