
राज्यातील फडणवीस-शिंदे-पवार या महायुती सरकारने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री अचानक बदलून राजकीय खळबळ उडवून दिली आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जागी गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांची भंडाराचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
.
भंडारा जिल्ह्यात अलिकडेच आलेल्या पुरामुळे स्थानिक लोकांच्या जीवनावर वाईट परिणाम झाला होता. परंतु जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले सावकारे यांनी पूरग्रस्त भागांना भेट दिली नाही. त्यामुळे बाधित शेतकरी, नागरिक आणि अगदी भाजप कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्याविरुद्ध प्रचंड नाराजी निर्माण झाली. भंडारा ओळखणाऱ्या आणि जवळच्या जिल्ह्यातील असलेल्या मंत्र्याला पालकमंत्री बनवावे अशी स्थानिक लोकांनी उघडपणे मागणी केली होती. सावकारे यांच्यावर जिल्ह्याला पुरेसा वेळ देता येत नसल्याचा आरोप होता. ते फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि जिल्हा नियोजन बैठकांपुरते मर्यादित होते. जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित ठोस निर्णयांमध्ये त्यांची भूमिका देखील अपुरी असल्याचे सांगण्यात आले.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, या बदलामागील उद्देश शिंदे गटाला धक्का देणे हा देखील आहे. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर हळूहळू जिल्ह्यात आपली पकड मजबूत करत होते. सावकारे यांच्या अनुपस्थितीमुळे भाजपची स्थिती कमकुवत होत चालली होती, तर शिंदे गटाचा प्रभाव वाढत होता. आगामी नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन भाजपने ही खेळी खेळली आहे. पंकज भोयर हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांचा विदर्भातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आहे. त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भोयर यांना भंडाराचे राजकीय समीकरण समजते आणि जवळच्या जिल्ह्यातील असल्याने ते जिल्ह्याच्या समस्यांकडे अधिक चांगले लक्ष देऊ शकतील.
घटक पक्षांना शह देण्यासाठी कुरघोडी
दोन सत्ताधारी आमदारांच्या वैमनश्यातून पालकमंत्री सावकारे यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. महायुतीतील मोठा भाऊ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पक्षातील सत्ताधारी आमदाराने जिल्ह्यातील महायुतील लहान भाऊ समजल्या जाणाऱ्या घटक पक्षांना शह देण्यासाठी ही कुरघोडी तर केली नाही ना असा प्रतीप्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण कधीकाळी भंडारा जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला होता, मात्र आता भाजपचा एकही लोकनियुक्त आमदार जिल्ह्यात नाही. यामुळे आगामी होऊ घातलेल्या स्थानिक नगर परिषद निवडणुकीत आपले वर्चस्व राहावे यासाठी सावकारेंची उचलबांगडी करत आपल्या मनमर्जीतील पालकमंत्री हवा असा अट्टाहास भाजपच्या ‘त्या’ आमदाराने वरिष्ठांकडे केल्याचे बोलले जात आहे. विशेषता जिल्ह्यामध्ये भाजपचे नेतृत्व स्थानिक नेत्याकडे नसून परजिल्ह्यातील नेत्याकडे आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील नेत्यालाच आपला नेता मानण्यात भाजप कार्यकर्त्यांना धन्यता मानावी लागत आहे. त्यामुळे आगामी नगर परिषदेमध्ये नवनियुक्त पालकमंत्र्यांचा करिष्मा चमत्कार करतो की फुसका ठरतो हे येणारा काळच ठरवणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



