
Laxman Hake To The Point Interview: राधाकृष्ण विखे पाटलांना मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा असल्याचा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी झी २४ तासच्या ‘टू द पॉईंट’ या विशेष कार्यक्रमात केला आहे. मुंबईत आलेल्या मराठा झुंडीपुढे सरकार अगतिक होतं. अशामध्ये आपण मराठा समाजाचा आवाज होण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखे पाटील करत होते असाही दावा लक्ष्मण हाकेंनी केला आहे. मात्र गेल्या काही पिढ्या कारखानदारी केलेल्या विखेंना सामाजिक न्याय काय कळतो? असा सवाल हाकेंनी केला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधी सरकारचा प्रतिनिधी म्हणून जाऊन भेटणं आणि नंतर वेगळं जाऊन भेटणं यावर काहींनी आक्षेप घेतल्यासंदर्भात विचारलं असता लक्ष्मण हाकेंनी उत्तर दिलं की, “झुंडीपुढे सरकार आगतिक होतं. आणि विखे पाटलांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं असं वाटत आहे. मग मराठा इतका त्वेषाने इथे आला असताना मी मराठा समाजासाठी काहीतरी करतोय, मला मसिहा होता येतंय का? किंवा यांचा आवाज होता येतंय का? हे लटके प्रयत्न आहेत”.
विखे पाटलांना मुख्यमंत्री होण्याच्या दाव्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, “मी सामान्य माणसाची भाषा बोलत आहे. मला कोणाची भीती ठेवण्याचं कारण नाही. तुमची पाचवी पिढी राजकारणात आहे, तुम्ही कारखानदारीशिवाय दुसरं काही केलं नाही. त्यांना सामाजिक न्याय काय कळतो? मी फार जबाबदारीने बोलत आहे. कोण हाके, त्याचा काय संबंध? अशी विचारणा त्यांनी केली होती”.
‘जीआरनंतर उपसमिती म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण’
मराठा आरक्षण जीआर नंतर ओबीसी उपसमिती नेमणं चुकीचं असल्याची भूमिका लक्ष्मण हाके यांनी मांडली आहे. जीआर काढण्याची प्रक्रिया सुरु असताना उपसमिती नेमायला हवी होती. मात्र जीआरनंतर उपसमिती म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका, हाकेंनी केली आहे. आधी जीआर रद्द करा, मग ठोस चर्चा करा असं आवाहनही त्यांनी केलं आहे
‘जीआर हा सरकारने दबावाला बळी पडून घेतलेला निर्णय’
मराठा आरक्षणाचा जीआर हा सरकारने दबावाला बळी पडून घेतलेला निर्णय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गावप्रमुख ते राज्य चालवणारे आमदार, खासदार मराठा आहेत. मात्र मराठ्यांना ओबीसीत घेणं संविधान आणि कोर्टाला मान्य नाही. त्यामुळे पुढच्या दारानं आत येणं शक्य नाही म्हणून कुणबी प्रमाणपत्राद्वारे, मागच्या दारानं भगदाड पाडून आत येण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप हाकेंनी केला आहे.
‘शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि आईबहिणीचा उद्धार…’
मनोज जरांगेंचं आंदोलन महाराष्ट्राला काय देतं असा थेट सवालही त्यांनी विचारला आहे. शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि आईबहिणीचा उद्धार करायचा हे त्यांचं आंदोलन, अशा शब्दांत हाकेंनी जरांगेंवर तोफ डागली. जरांगेंच्या बॅनरवर कधी शाहू, आंबेडकर दिसले का? असा सवालही त्यांनी केला. जरांगेंना न्यायालयाचा निर्णय मान्य नाही. मराठा आरक्षण घेणं म्हणजे OBC आरक्षण उद्ध्वस्त करणं हे जरांगेंचं धोरण असल्याची टीका हाकेंनी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.