digital products downloads

‘भाजपाला जिंकवून शेतकऱ्यांनी स्वत:च्याच पायात गुलामीच्या बेड्या बांधल्या, मोदींनी नक्की काय…’; ठाकरे सेनेचा सवाल

‘भाजपाला जिंकवून शेतकऱ्यांनी स्वत:च्याच पायात गुलामीच्या बेड्या बांधल्या, मोदींनी नक्की काय…’; ठाकरे सेनेचा सवाल

ZP Election Maharashtra 2026 Results Uddhav Thackeray Shivsena On BJP Win: “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने हॅटट्रिक साधली आहे. आधी नगरपालिका, महानगरपालिका व आता जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपने मोठे यश संपादले हे मान्य करावे लागेल. ग्रामीण भागातही कमळ फुलले असे यावर सांगितले गेले. ही कमळे अलीकडे कोणत्याच निवडणुकीत कोमेजताना दिसत नाहीत. निसर्गाचा हा कोणता चमत्कार म्हणायचा? कारण ही निसर्गनिर्मित तळ्यातली कमळे नसून कृत्रिम कमळे आहेत. ती खरी वाटतात, पण खरी नाहीत. हा सर्व चिनी माल आहे. भाजपबरोबर बनावट शिवसेनेसही विजयाचा मोठा आकडा लागला. त्यांचा विजयही खरा नाही. ज्यांचा पक्ष आणि चिन्हच खरे नाही त्यांचा विजय खरा कसा मानावा? तरीही बेधुंदपणे गुलाल उधळणे सुरू आहे,” असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

Add Zee News as a Preferred Source

विरोधकांची पीछेहाट झाल्याच्याच बोंबा

“जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीत जात असताना अजितदादांचे विमान कोसळले. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक शोकलहर निर्माण झाली, राज्य हळहळले. हीच हळहळ मतपेटीतून दिसली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपपाठोपाठ मोठे यश मिळाले. अजित पवार यांना पुणे-पिंपरी-चिंचवड या स्वतःच्या भागांत महापालिका निवडणुकीत हार पत्करावी लागली होती; पण आता पुणे जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मतदारांनी अजित पवारांना मतरूपी श्रद्धांजली वाहिल्याचे दिसले. काँग्रेस, शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मर्यादित यश मिळाले. इतर अपक्ष वगैरे निवडून आले, पण भाजपचे यश घवघवीत आहे. ज्यांच्या हाती सत्ता व पैसा असतो ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी होतात हा अनुभव यावेळीही आला. त्यामुळे सत्ताधारी आघाड्या जिंकल्या असल्या तरी त्यापेक्षा विरोधकांची पीछेहाट झाल्याच्याच बोंबा जास्त मारल्या जात आहेत. या विजयाचे आणि पीछेहाटीचे विश्लेषण सर्व पातळ्यांवर चालले आहे,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायात गुलामीच्या बेड्या बांधून घेतल्या

“महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेला विनम्रपणे साष्टांग दंडवत घालावा असाच हा निकाल आहे. लोकशाही म्हणून हे निकाल स्वीकारायचे की कपाळावर हात मारून घ्यायचा, असा संभ्रम या निकालातून होतो. भाजपच्या विजयाचे श्रेय नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले जात आहे. महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत तीन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील बहुसंख्य आत्महत्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आहेत. बीड जिल्हा अशा आत्महत्यांत पुढे आहे. तरीही मराठवाडय़ात लातूर वगळता सर्वत्र कमळ, धनुष्यबाणास मतदान व्हावे हे अनाकलनीय आहे. अमेरिकेबरोबर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या व्यापार करारामुळे शेतकरी उद्ध्वस्तच होणार आहे. बाजार-मंडईत अमेरिकेचा माल घुसवून आमच्या शेतकऱ्यांना देशोधडीस लावण्याचे कारस्थान भाजप व पंतप्रधान मोदी यांनी केले आणि त्या कारस्थानी कराराचे स्वागत देवाभाऊंनी टाळ्या वाजवून केले. तरीही या उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांनी, त्यांच्या बायकामुलांनी भाजपच्या कमळावर विजयाचा शिक्का मारला व स्वतःच्या पायात गुलामीच्या बेड्या बांधून घेतल्या यावर कोणी विश्वास ठेवील काय?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

मोदींनी नक्की काय केले की, ज्यामुळे महाराष्ट्र…

“विदर्भ, मराठवाडा, कोकणातील तरुण बेरोजगार आहे. नवा उद्योग नाही, धंदा नाही. मूठभर ठेकेदारांची भर करणारे उद्योग म्हणजे विकास हे समीकरण बनले. साखर कारखानदारी अडचणीत आल्याने ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. शेतकऱ्यांच्या चुली विझत आहेत; पण मतदानासाठी पाच-सहा हजारांची पाकिटे घरपोच पडल्याने महाराष्ट्रात हा विजयाचा गुलाल उधळला जात असेल तर या पिढीने आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा सौदा केला, असेच उद्या म्हटले जाईल. जे लोक महाराष्ट्रातील जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांतील भाजपच्या विजयाचे श्रेय पुन्हा मोदींनाच देत आहेत, त्यांनी आधी याचा खुलासा करावा की, मोदी यांनी नक्की काय केले की, ज्यामुळे महाराष्ट्र तेजाने आणि वैभवात उजळून निघाला? मुंबईसह महाराष्ट्रातील मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात आधीच गेले व इतर सर्वच बाबतीत मोदी-फडणवीसांची धोरणे वाहून गेली. मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्वच्छता मिशन, महागाई, काळा पैसा परत आणणे, रुपयाचे अवमूल्यन, दोन कोटी नोकऱ्या देणे, महिलांची सुरक्षा, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे वगैरे मुद्दय़ांवर मोदींची थापेबाजी चव्हाट्यावर आली. शिक्षण व रोजगारीच्या मुद्द्यांवर मोदी व फडणवीसांच्या योजनांनी मातीच खाल्ली,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘कमळदला’ने राज्याच्या ग्रामीण जीवनाची आणि अर्थकारणाची ‘दलदल’ करून ठेवली

“देशातील एका पिढीचा आत्मविश्वास मारून त्यांना या लोकांनी अंधभक्त बनवले. जे बेरोजगार युवक गायी चरायला नेतील त्यांना महिन्याला दहा हजार रुपये मानधन देण्यासारख्या योजना त्यातूनच निर्माण झाल्या. बेरोजगारांनी ‘भजे-पकोडे’ तळावेत असे मार्गदर्शन पंतप्रधान मोदी करतात. गेल्या पाच वर्षांत देशभरात सवा लाख सरकारी शाळा बंद झाल्या. त्यात शेतकऱ्यांचीच मुले शिकत होती. देशाचा इतका सगळा ‘इस्कोट’ होऊनही ग्रामीण जनता कमळ फुलवीत असेल तर ते कमळ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावे लागेल. ‘फुलती कमळदल’ ही संकल्पना चिखलात उमलणाऱ्या पवित्र, सुंदर आणि सुगंधी कमळांचे वर्णन करते. कमळाला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, पण आपल्या देशात आणि महाराष्ट्रात भ्रष्ट पैशांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखलच झाला आहे. त्या चिखलातून आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुन्हा कमळदल फुलले असले तरी शेतकरी, कष्टकरी यापुढेही चिखलात गटांगळय़ाच खाताना दिसतील. कारण याच ‘कमळदला’ने राज्याचे ग्रामीण जीवन आणि अर्थकारण यांची ‘दलदल’ करून ठेवली आहे,” असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp