
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तीन दिवस तीव्र संघर्ष झाला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यात अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले
.
बच्चू कडू म्हणाले, नेहमी-नेहमी पाकिस्तानचे वार सुरू असतात. पाकिस्तानचे नेहमीचे दुखणे बंद केले पाहिजे. जसा इंदिरा गांधी यांनी बांगलादेश वेगळा काढला, तसाच पाकिस्तान भारतात घ्यावा. त्यासाठी जर सैनिक कमी पडत असतील तर प्रहारचा कार्यकर्ता आणि बच्चू कडू तयार आहे, असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सध्या पवार कुटुंब आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, असे झाले तरी जनतेचे काय भले होणार आहे? राष्ट्रवादी कधी वेगळी होती? पवार साहेब आणि अजित दादा हे वेगळे होते हे शक्य आहे का? ते एकत्रच होते. मीडियासमोर आणि लोकांसमोर नव्हते. मात्र ते एकत्रच होते, असे कडू म्हणाले आहेत.
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले दोन जूनला आमचे आंदोलन सुरू होईल आणि 3 जूनला आमची बारामतीत सभा होईल. तीन तारखेला पंकजा मुंडे, चार तारखेला बाळासाहेब पाटील, पाच तारखेला संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन होणार आहे. तर सात जूनला राज्याभिषेकाच्या दिवशी आम्ही नागपूरकडे आगेकूच करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आमचे मुक्कामी आंदोलन राहील.
कोरोना काळात ताटे वाजवले होते. त्यामुळे ताटे वाजवून आंदोलन करणार आहोत. त्यांनी जे बोलले होते, त्याची आठवण करून देण्यासाठी ताटे वाजवणार आहोत, कारण ते विसरले आहेत. बावनकुळे म्हणतात पाच वर्षात आम्ही कधीही कर्जमाफी करू. जनतेला फसवण्याचे काम हे सरकार करत आहे. वेळ पडली तर आम्ही गुन्हे दाखल करून कोर्टात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार होते. पण अजून पंधराशे रुपयांवरच आहे. सरकारला लाडका शब्द हा कडवट होत आहे. लाडक्या बहिणींवर आणि लाडक्या शेतकऱ्यांवर राज्य सरकारचे लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बारामतीतून आंदोलन करणार आहोत. बारामतीतून सुरुवात करतोय कारण अर्थखाते बारामतीत आहे आणि ते म्हणतात अर्थ नाही. आम्ही त्यांना सांगणारा आहोत की अर्थ कसे निर्माण केले जाते. आमच्या जवळून घेतलेले पैसे आम्हाला परत जरी केले तरी आमच्या सर्वांचं कर्ज माफ होऊ शकतं. कर्जमाफीसाठी 35 ते 40 हजार कोटी रुपये पाहिजेत. यातून शेतकरी आणि दिव्यांगांचे कर्ज माफ होऊ शकते, असे बच्चू कडू म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.