
- Marathi News
- National
- Terror In Villages On The Border Due To Pakistani Firing; Villagers Spend The Night In Bunkers, Similar Situation In More Than 12 Villages Of Jammu Srinagar
मुदस्सीर कुल्लू | जम्मू/श्रीनगर32 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पाकिस्तानच्या सैन्याने गेल्या सहा दिवसांपासून नियंत्रण रेषेवरील भारतीय गावांवर गोळीबार सुरू केला आहे. भारतीय सैन्य त्याला प्रत्युत्तर देत आहे, परंतु या गोळीबारामुळे या गावांमध्ये दहशत पसरली आहे. लोक दिवस कसाबसा काढतात, पण सायंकाळ होताच त्यांना गावांमध्ये बांधलेल्या बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागतो. जवळपास १२ पेक्षा जास्त गावांमध्ये हीच परिस्थिती आहे.जम्मूच्या सुंदरबनी भागात राहणारे ४८ वर्षीय सुनील शर्मा म्हणाले, गेल्या सहा दिवसांपासून पत्नी आणि दोन मुलांसह मातीच्या बंकरमध्ये रात्र घालवत आहोत. आम्ही हा बंकर दहा वर्षांपूर्वी बांधला होता. त्याचा क्वचितच वापर झाला. पण आता सीमा पारून अंदाधुंद गोळीबार होत असल्याने हा बंकर संध्याकाळी ६ ते सकाळी ७ वाजेपर्यंत आमच्या जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडत आहे. २६-२७ एप्रिलच्या रात्री सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात अनेक घरे नुकसानग्रस्त झाली होती. येथे २०० कुटुंबांपैकी ५० आधीच त्यांच्या नातेवाइकांकडे गेले आहेत. आम्ही पशुधनाची काळजी घेण्यासाठी थांबलो आहोत.
बंकर नसलेल्या ठिकाणी प्रशिक्षण
बलकोट गावचे मोहंमद अमीन म्हणाले, २०२० मध्ये पाकच्या गोळीबारात येथे ५ लोक मरण पावले होते. कारण आमच्याकडे बंकर नव्हते. उत्तरी काश्मीरच्या तंगधारचे प्राचार्य मोहंमद युनिस म्हणाले, मुलांना अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण देत आहोत. भारत-पाकदरम्यान ३३२३ किमीची सीमा आहे. यात जम्मूपासून लेहरपर्यंत ७४० किमी सीमा आहे.
बंकरमध्ये ६ ते १० लाेकांचा मुक्काम
जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरच्या ट्रेवा गावच्या माजी सरपंच बलवीर कौर म्हणाल्या, आम्ही बंकरमध्ये राहायला सुरुवात केली आहे. एलओसीवर असे बंकर सीमेपासून शून्य ते ३ किमीच्या परिघात बांधले आहेत. यात १० लोक राहू शकतात. गेल्या रात्री एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाक सैन्याने १२ ठिकाणी गोळीबार केला. २४ एप्रिलपासून अखनूर, कुपवाडा, बारामुल्ला, परगवाल, नौशेरा, सुंदरबनी, पूंछ, कमलकोट, आरएसपुरा आणि उरी भागात ते गोळीबार करत आहेत. भारतीय सैन्याच्या उत्तरेकडील आघाडीचे डिफेन्स लेफ्टनंट कर्नल सुनील बर्तवाल म्हणाले, आम्ही मर्यादित प्रत्युत्तर दिले.
अतिरेकी हल्ल्याचा परिणाम…
कटरा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम जम्मूच्या कटरा येथील माता वैष्णोदेवी धामला येणाऱ्या भक्तांवरही झाला आहे. रोज येणाऱ्या भक्तांची संख्या ४५% ने कमी झाली आहे. हॉटेल व्यवसायी संघाचे अध्यक्ष राकेश वजीर म्हणाले, हल्ल्याच्या आधी रोज सरासरी ३० ते ३५ हजार भक्त माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी कटरा येत होते. पण २२ एप्रिलपासून त्यांची संख्या २० ते २५ हजारांच्या दरम्यान आहे. मे आणि जूनच्या जवळपास ४०% हॉटेल बुकिंग रद्द झाली आहे. टूर ऑपरेटर अनिल शर्मा म्हणाले, सध्या अर्धा कटरा रिकामा आहे. वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे सीईओ अंशुल गर्ग यांनीही मान्य केले आहे की, पहलगाम हल्ल्यानंतर रोज येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या कमी झाली आहे. पण, तरीही वार्षिक आधारावर पाहता आतापर्यंत २५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी दर्शन घेतले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.