
शिवसेना ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर पक्षात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. परंतु भास्कर जाधव पक्षावर नाराज नसल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. भास्कर जाधव आणि पक्षप्रमुख यांचे नियमित बोलणे होत असते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी एखादी
.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक पार पडली. मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीला अंबादास दानवे, विनायक राऊत यांची देखील उपस्थिती होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत, सुभाष देसाई आणि अनिल देसाईंसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी कशाप्रकारे सक्रिया व्हावे, यावर चर्चा करण्यासाठी संघटनात्मक बैठक होती, असे अंबादास दानवे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
कोणताही विचार नसताना लोकांना संघटनेत प्रवेश दिला जातोय ठाकरे गटाला सध्या गळती लागल्याचे दिसत आहे. पक्षातील अनेक नेते भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करत आहेत, याबाबत अंबादास दानवे यांना विचारले असता, मोठे मोठे प्रलोभन देऊन, कोणताही विचार नसताना लोकांना संघटनेत प्रवेश दिला जात आहे. संघटना कोणासाठी थांबत नसते. संघटना ही सतत चालणारी प्रोसेस आहे. शिवसेनेने याआधी असे अनेक अनुभव घेतलेले आहेत. या सगळ्या अनुभवातून शिवसेना तावून, सुलाखून निघाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
चांगले लोक गेले, हे मान्य केले पाहिजे कोकणातून एकेकाळी मुख्यमंत्री असलेले नारायण देखील पक्ष सोडून गेले होते. त्यानंतर शिवसेना कोकणात उभी राहिली. तेथून शिवसेनेचे खासदार आणि आमदार निवडून आले. सध्या कोकणातील चांगले लोक गेले, हे मान्य केले पाहिजे. परंतु, संघटना यावरही मात करेल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.
भास्कर जाधव पक्षावर नाराज नाहीत कोकणातील शिवसेनेचे एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला संघटनेत काम मिळत नसल्याची खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली आहे. याबाबत पत्रकारांनी अंबादास दानवे यांना छेडले असता ते म्हणाले, भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत. मी लहान शिवसैनिक आहे. त्यामुळे मी त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. पक्षप्रमुख आणि त्यांचे नियमित बोलणे होते. त्यांनी एखादी प्रतिक्रिया व्यक्त केली म्हणजे ते पक्षावर नाराज आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. भास्कर जाधव शिवसेनेचे विधानसभेतील नेते आहेत. या जबाबदाऱ्या मोठ्याच आहेत. भास्कर जाधव आणि पक्षप्रमुख यांचे नियमित बोलणे होत असते. ते आजच्या बैठकीलाही व्हिडिओ कॉलद्वारे हजेरी लावली होती. वेळेवर बैठक ठरल्यामुळे ते मुंबईत पोहोचू शकले नाही, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.
रामदास कदमांना लगावला टोला ठाकरे गट एकनाथ शिंदेंवर बोलला तर, मातोश्री आम्ही अनेक दिवस काढलेत. आम्ही बोलायला सुरुवात केली, तर अवघड होईल, असा इशारा रामदास कदम यांनी दिला होता. यावरही अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया दिली. रामदास कदम यांच्याविषयी काय बोलणार? जे काही बोलायचे होते, ते बोलून टाकले आहे. आम्ही काढलेले आहे, तर तुम्हीही बोला, तुम्हाला कोणी थांबवले, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.
शिवसेना प्रमुखांची संघटना उद्धव ठाकरेंकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार आहेत, मात्र संघटना नाही, अशी टीका दानवे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर केली. शिवसेना प्रमुखांची जी संघटना आहे, ती उद्धव ठाकरेंकडे आहे. तुमच्याकडे खरेदी-विक्री व्यवहारातून आलेली मंडळी आहे, असे मी जबाबदारीने सांगेल, असे ते म्हणाले.
सध्याच्या घडीला पक्षाला शिस्त महत्त्वाची ठाकरे गटाला गळती लागलेली असताना देखील पक्षातून नेत्यांची हकालपट्टी केली जात आहे. रत्नागिरीतील तीन नेत्यांची आज पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत हकालपट्टी करण्यात आली. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, काही पक्षविरोधी काम करत असतील, तर पक्षाला या सगळ्याचा विचार करावा लागतो. कारण सध्याच्या घडीला पक्षाला शिस्त महत्त्वाची आहे. पक्षाची शिस्त सोडून कोणी पक्षापेक्षा मोठा नाही, हा संदेश पण द्यावा लागतो. तो दिला असेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.