
Shivjayanti 2025 Raj Thackeray On Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (तिथीप्रमाणे) आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त ठिकाठिकाणी वेगवेगळ्या संस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी प्रभातफेऱ्या, मिरवणुका आणि महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. असं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही एका खास पोस्टच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
365 दिवस शिवजयंती साजरी करायची म्हणजे…
राज ठाकरेंनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शिवरायांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक विशेष संदेश पोस्ट केला आहे. “आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते. यावर मध्येमध्ये वाद पण होत असतात. खरंतर महाराजांची जयंती ही 365 दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण 365 दिवस साजरी करायची म्हणजे शिवचरित्रातून 365 दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केलं पाहिजे,” असं राज ठाकरेंनी पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे.
…याला एक अद्वितीय प्रतिभाच असली पाहिजे
“वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पहायचं, त्याची ध्येयधोरण आखायची आणि स्वतःच आर्थिक चलन आणायचं , फार्सी भाषा नाकारून स्वतःचा मराठी शब्दकोश निर्माण करायचा, पुढे एक एक किल्ले जिंकायचे आणि लहान वयातच पीछेहाट पण सहन करायची आणि हे करताना आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांचे मनोधैर्य कुठेही खचू द्यायचे नाही याला एक अद्वितीय प्रतिभाच असली पाहिजे,” अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी शिवरायांच्या कार्यावर भाष्य केलं आहे.
महाराजांच्या आयुष्याकडे बघितलं की…
“महाराजांच्या आयुष्यात मधला एक कालखंड असा एक जाणवतो की त्यात फार काही घडत नाही असं वरवर बघणाऱ्याला वाटेल, पण त्याच काळात महाराजांनी खूप पुढची आखणी केली. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे तसं, जेव्हा बाहेर वादळ असतं तेव्हा शांत आत बसून शक्ती साठवून ठेवावी आणि जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा आपलं वादळ निर्माण करावं. महाराजांच्या आयुष्याकडे बघितलं की नेहमी कुतूहल वाटतं की ही समज इतक्या लहान वयात कुठून आली असेल,” असंही राज यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
…मग असली किरकोळ नैराश्य कधीच येणार नाही
“आजकाल छोट्या छोट्या पीछेहाटीने किंवा नकाराने नैराश्य येण्याच्या काळात, प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे पारायण केलं तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा महाराजांनी किती शांतपणे स्वराज्य उभं केलं हे जाणवेल, आणि मग असली किरकोळ नैराश्य कधीच येणार नाहीत,” असा सल्ला राज यांनी दिला आहे.
मला जे योग्य वाटतं ते मी…
राज ठाकरेंनी स्वत:बद्दल बोलताना या पोस्टमध्ये, “माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे, त्यामुळे कधीच नैराश्य, नकारात्मकता मला स्पर्शून पण जात नाही आणि झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी विचारांती बोलतो, आणि हे करताना महाराष्ट्र घडवण्याचं माझं जे ध्येय आहे त्यावरची अगाढ श्रद्धा टिकून राहते हे सगळं शिवचरित्राने मला दिल आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून सदैव मिळत राहू दे हीच इच्छा,” असंही म्हटलं आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज या अलौकिक नायकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानाचा मुजरा!,” असं म्हणत राज ठाकरेंनी पोस्ट संपवली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.