
Indapur News : उन्हाळा सुरु होताच लग्नाच्या सिझनला सुरुवात होते. यावेळी लग्नाला आलेले वऱ्हाडी लग्नातल्या मटणावर ताव मारताना दिसत असतात. अशातच आता लग्नातल्या पंगतीत मटणावर ताव मारणं एका वऱ्हाड्याला भलतंच महागात पडलं आहे. लग्नाच्या पंगतीत जेवताना मटणाचं हाड वऱ्हाड्याच्या घशात अडकल्यानं एका वऱ्हाड्याला चक्क हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आहे. ही संपूर्ण घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे घडली आहे. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी घडली होती.
लग्नाच्या पंगतीत मटण खाणं पडलं महागात
इंदापूरमध्ये एका विवाह सोहळ्यात मटणावर ताव मारताना वऱ्हाड्याने घाई गडबडीत चुकून रश्यातील पिस समजून चक्क हाडच गिळले होते. यानंतर त्या वऱ्हाड्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यानंतर वऱ्हाड्याला तेथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, गंभीर परिस्थिती असल्याने त्याला ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी सीटी स्कॅनद्वारे हाडाची अचूक स्थिती शोधून काढली. अडकलेल्या हाडाचे आकारमान 5.3 बाय 3 सेमी इतके होते. त्यामुळे अन्ननलिका आणि श्वासनलिकेला मोठा धोका निर्माण झाला. ससून रुग्णालयामधील डॉक्टरांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया एंडोस्कोपीद्वारे यशस्वी करण्यात आली.
इंदापुरातील घटनेनंतर डॉक्टरांचा नागरिकांना सल्ला
इंदापूरमधील या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेतील वऱ्हाड्याचा तर जीव वाचलाच मात्र, तुम्ही जेवताना घाई गडबड करू नका. त्यासोबतच दररोज जेवताना मोबाईल पाहणे बंद करा. जेवण करताना प्रत्येक घास चावून खावा. या गोष्टी पाळण्याची सध्या खूप गरज आहे. आजचे युग जरी फास्ट असले तरी किमान आपण जेवताना तरी थोडा वेळ आणि निवांतपणे जेवण करणे गरजेचे आहे असे मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.
अनेक जण मटणावर ताव मारताना खूप घाई करत असतात. त्यामुळे अनेकांना मटण खाल्ल्यानंतर पचन होण्यास देखील त्रास होतो. त्यामुळे जर तुम्ही मित्रांसोबत शेतात जरी पार्टी करत असाल तर तुम्ही देखील अशा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.