
Who Is Manoj Jarange Interesting Facts: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक हजारोंच्या संख्येनं मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईमधील आझाद मैदान येथे दाखल झाले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून या आंदोलनाचा इशारा जरांगे देत होते. अखेर आज ते साडेसहा हजार गाड्यांच्या ताफ्यासहीत मुंबईत दाखल झाले. मनोज जरांगेंना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली असली तरी त्यांचे समर्थक महिन्याभराचं सामना घेऊन आले आहेत. त्यामुळेच आज सायंकाळी जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना आंदोलन स्थगित करण्यास सांगणार की इतर काही मध्यम मार्ग काढला जाणार हे लवकरच निश्चित केलं जाईल. दरम्यान, मनोज जरांगेंनी आझाद मैदानावरुन भाषण देताना सरकारने गोळ्या घातल्या तरी मी आरक्षण मिळेपर्यंत इथून हटणार नाही असं म्हणत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय घेऊन मुंबईत दाखल झालेल्या जरांगेंचा बायोडेटा अनेकांना ठाऊक नाही. त्यांनी यापूर्वी कोणकोणती आंदोलनं केली आहेत? ते दोन वर्षांपूर्वीच अचानक प्रकाशझोतात का आले? त्यांनी मराठा आंदोलनासाठी खरोखर जमीन विकली का? त्यांच्या कुटुंबात कोणकोण आहे? याबद्दल जाणून घेऊयात…
जरांगेंना प्रकाशझोतात आणणारं लाठीचार्ज प्रकरण कोणतं?
2023 साली सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावात पोलिसांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. या प्रकरणाचे पडसाद पुढील अनेक दिवस महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये उमटले. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही मराठा संघटनांकडून करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं. ज्या ठिकाणी हा लाठीचार्ज झाला तिथे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु होते.
अनेक नेते अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले…
लाठीचार्ज झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, छत्रपती संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यासारखे नेते मनोज जरांगे यांना भेटू आले आहेत. मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रयत्न केले. अखेर आरक्षण देण्यासाठी महिन्याभराचा वेळ मागून राज्य सरकारने जरांगेंना उपोषण मागे घेण्यासंदर्भातील तडजोड यशस्वीपणे केली होती. मात्र महिन्याभरात काहीही न झाल्यानंतर जरांगेंनी भव्य सभा घेतली होती.
जमीन विकली
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे मागील 10 ते 15 वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून काम करत आहेत. मनोज मूळचे बीडमधील मातोरीचे रहिवाशी आहेत. मात्र मागील काही वर्षांपूर्वी ते जालन्यामधील अंबड तालुक्यामधील अंकुशनगरात वास्तव्यास आहेत. जरांगे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे.
जरांगेंना तरुण वयापासूनच समाजसेवेची आवड असल्याने आपल्या सामाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यासाठीच मनोज जरांगे यांनी अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला आर्थिक पाठबळ देतानाही पुढचा मागचा विचार केला नाही.
एका तपाहून अधिक मोठा लढा
पांढरा पायजमा आणि 3 गुंड्यांचा शर्ट, गळ्यात भगवा आणि छोटीशी वाढलेली दाढी अशाच लूकमध्ये मागील अनेक वर्षांपासून मनोज जरांगे अगदी मंत्रालयापासून ते आंदोलनापर्यंत सगळीकडे दिसत आहेत. मागील एका दशकाहून अधिक काळापासून मनोज जरांगे सातत्याने मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करत आहेत. जरांगे यांनी या कालावधीमध्ये अनेक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोको केले, तरुणांना संघटित करुन आपली मागणी लावून धरली.
मराठ्यांसाठी लढणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मनोज जरांगे यांना संपूर्ण मराठवाड्यात ओळखलं जातं. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मनोज जरांगे यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आई-वडील असा मनोज यांचा परिवार असून त्यांचाही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.
काँग्रेस पक्षासाठी काम
मनोज यांनी सुरूवातीला काही काळ काँग्रेस पक्षासाठी काम केलं. मात्र त्यांनतर त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि कधीच कोणत्याही राजकीय पक्षाच्या वळचणीला गेले नाहीत. त्यांनी स्वत:ची शिवबा संघटना स्थापन केली. त्यांनी फार आक्रमक पद्धतीने मराठ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून केली. महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर हल्ला केल्याच्या प्रकरणामध्ये मनोज जरांगेच्या शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवरच आरोप झाले.
मोर्चे, आंदोलने, चळवळ अन् भेटीगाठी
मराठा आरक्षणासाठी मनोज आता मुंबईत धडकले असली तरी यापूर्वी त्यांनी 50 च्या आसपास आंदोलने केली आहेत. त्यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शहागडपासून मंत्रालयावर 60 किमीपर्यंत मोठा मोर्चाही त्यांनी नेला होता. या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधलं होतं आणि त्याची राज्यभर चर्चा झालेली. त्यांनी अनेक मराठा आंदोलनांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षण का गरजेचं आहे याबद्दल माहिती देऊन मराठ्यांना एकत्र केले. अनेकदा त्यांनी आपली निवेदने आणि मागण्यांसाठी मंत्रालयाचा उंबरठाही झिजवला आहे. ते अनेकदा यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये ‘वर्षा’ बंगल्यावरही गेले. मनोज जरांगे यांच्या समर्थकांच्या सांगण्यानुसार, या माणसाचं आजपर्यंतच निम्मं आयुष्य हे मोर्चे, आंदोलने, चळवळ आणि सरकारी इमारतीच्या पायऱ्या झिजवण्यात गेलं आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
FAQ
मनोज जरांगे पाटील कोण आहेत?
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी गेल्या 15 वर्षांपासून लढणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरीचे रहिवासी असलेले जरांगे सध्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगरात राहतात. त्यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक उपोषणे, मोर्चे आणि आंदोलने केली आहेत.
मनोज जरांगे पाटील प्रकाशझोतात कशामुळे आले?
2023 मध्ये सप्टेंबर महिन्यात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेने मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरात प्रसिद्धी मिळाली. या लाठीचार्जमुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली, आणि जरांगे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने जोर धरला.
मनोज जरांगे यांच्या कुटुंबात कोणकोण आहे?
मनोज जरांगे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील यांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.