
Tukaram Maharaj Abhang: आषाढी वारी सुरू आहे असून रविवारी आषाढी एकादशी आहे . हजारो वारकरी वारीत सहभागी होत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला निघाले आहेत. वारीला हजारो वर्षांची परंपरा आहे. वारीत समाधान मिळते, असं जाणकार सांगतात. आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी असंही म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी संतांनी लिहून ठेवलेले अभंग आजच्या घडीलाही आपल्या आयुष्याशी किती जुळताहेत हे पाहुन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. गेल्या काही वर्षांपासून आजच्या तरुण पिढीला सतावणार प्रश्न म्हणजे मानसिक आरोग्य आणि अतिविचार करणे. आपलं मन ताब्यात कसं ठेवावं, याचं वर्णन संत तुकाराम एका अभंगात करतात. काय आहे हा अभंग आणि त्याचा अर्थ हे आज जाणून घेऊयात.
संत तुकाराम महाराजांचा अभंग
मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥
आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥
धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी । केलें तडातडी चित्त माझें ॥२॥
तुका म्हणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥३॥
अभंगाचा अर्थ
देवा माझे मन फार चपळ आहे ते निश्चिंत एका ठिकाणी राहत नाही, एक घडी काय एक क्षण स्थिर राहत नाही. त्यामुळे हे नारायणा तू माझ्या विषयी उदास होऊ नकोस मी दीन आहे त्रासलेलो आहे. त्यामुळे तु माझ्याकडे लवकर धाव घे. देवा माझे इंद्रिय माझ्या मनाचेच ऐकतात व माझे मन विषयाकडे ओढ घेते त्यामुळे माझ्या चित्ताची त्यांनी तडातोड केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा आता ह्या मनापुढे माझे काहीही चालत नाही आता तुच ह्या मनाला हरी नामाची ओढ लावुन एका ठिकाणी चित्त स्थिर करशील अशी अपेक्षा मी तुझ्यापाशी धरून राहिलो आहे.
आपले मन कधीच स्थिर राहत नाही. म्हणजेच आजच्या काळात म्हणायचे झाले तर ओव्हरथिंक करणे. तुकाराम महाराज पहिल्या चरणात म्हणतात कि मन हे इतके चपळ आहे कि एका जागी निश्चल राहातच नाही. आता काय करावे या मनाचे या चिंतेने ते व्यस्त आहेत. आपणही आजच्या काळात नकळतपणे सतत मनात विचार करत असतो. हे विचार नकळतपणे आपल्या इच्छा, आकांशाभोवती फिरत असतात.
तिसऱ्या चरणात ते म्हणतात की, धाव घाली पुढे, इंद्रियाचे ओढी, हे जे माझे मन आहे ते शरीरातील या इंद्रियांच्या मागे एवढे लागले आहे कि ते मला सावरता येत नाही आहे. या इंद्रियांच्या आवडीने हे मन मला सतावत आहे. म्हणजेच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं मन सतत बाहेर भटकत राहतं. एककीडे आपल्याला हे समजतंय की आपले मन अतिविचार करतेय. पण मन ताब्यात कसं ठेवावे हे अनेकांना कळत नाही.
संत तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात त्यांनी थेट विठ्ठलालाच साद घातली आहे. म्हणजेच त्यांनी एकप्रकारे समर्पण केलेच आहे. आता तूच काय तो मार्ग दाखव, मी तुझीच आस धरून राहिलो आहे, असं ते म्हणतात. म्हणजेच काय तर मनाला ताब्यात ठेवण्यासाठी समर्पण भावदेखील महत्त्वाचा आहे. विठ्ठलाला शरण येणे म्हणजे भौतिक गोष्टींमध्ये अडकून न पडता त्या शक्तीला शरण जाणे हेच संत तुकाराम या अभंगातून सांगतात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.