
Marathwada Flood Update: मराठवाड्यासह राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट आलंय. दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून पुन्हा जोरदार बरसायला सुरुवात केलीय. मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूरला पावसाने झोडपलंय. तर तिकडे हिंगोलीत ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सोलापूर जिल्ह्यात सीना नदीच्या पुरामुळे धोक्याचा इशारा देण्यात आलाय. त्यातच जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालीय.
धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार
धाराशिव जिल्ह्यात पावसानं पुन्हा धुमाकूळ घातलाय. भूम, परंडा वाशी परिसरात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झालीये. नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. भूम आणि परंडा या भागात एनडीआरफच्या दोन टीम मागवण्यात आल्यात. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केलीये. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलंय.
हिंगोलीत ढगफुटीसदृश्य पाऊस
हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून ते पहाटे पर्यंत मुसळधार पाऊस झालाय, वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं, ईसापूर धारणाच्या 11 गेट मधून पैनगंगेच्या पात्रात 18 हजार 668 क्यूसेक्सने विसर्ग केला जात असल्याने मराठवाड्यातून विदर्भात जाणारा माळेगाव शेम्बाल पिंपरी पुसद मार्ग वाहतुकीसाठी बंद पडलाय, या पावसामुळे नदी ओढे नाले तुडूंब भरून वाहत आहेत, वसमत तालुक्यातील पांघरा शिंदे, दांडेगाव दांडेगावकडे जाणारे मार्ग ओढ्याला पाणी आल्याने बंद पडलेत, यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
बीड जिल्ह्यात मुसळधार
बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. तीन दिवस पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे जनजीवन पूर्वरत होत असतानाचा मध्यरात्री पुन्हा जोरदार पावसाने धुमाकुळ घातला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरले असून बीडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनमध्येही पाणी शिरले आहे. संपूर्ण पोलिस ठाणे पाण्याखाली गेल्याने कामकाज बंद आहे.
नांदेड जिल्ह्यात शाळांना सुट्टी
हवामान खात्याने आज नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलाय. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीय. मागच्या आठवडाभरात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस झाला नव्हता. मात्र गोदावरी नदीत धरणांचं पाणी सोडण्यात येत असल्याने पुर परिस्थिती कायम होती. विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यात पाऊस सुरुय.
सीना नदीच्या पाणीपातळी पुन्हा वाढ
सोलापूर करमाळा भागात मुसळधार पाऊस. सीना नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली असून करमाळा तालुक्यातील 20हून अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर पाऊस आणि पूर स्थितीमुळे आज दिवसभरात सुमारे 300 ग्रामस्थांचे स्थलांतर होणार आहे. सीना खोऱ्यामध्ये परत एकदा पहाटेपासून जोरदार मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळे सीना कोळेगाव धरणातून 50 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर नियंत्रणासाठी नदीमध्ये सोडण्यात आला आहे यामुळे माढा आणि करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठी पुन्हा एकदा पूरस्थिती तयार होऊ लागलेली आहे करमाळा तालुक्यातील 22 रस्ते बंद झालेले आहेत. माढा तालुक्यातील उंदरगाव येथील सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेलेला आहे पुलावरून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे मदतीसाठी एक ndrf पथक तर मिलिटरी पथक सुद्धा दुपारपर्यंत या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेला आहे
लातूरला रेड अलर्ट
लातूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. प्रशासनाकडून लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद. तेरणा आणि मांजरा नदीला आला पूर. नदीकाच्या गावाला सतर्कतेचा इशारा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.