
Difference Between Maratha And 96 Kuli Maratha: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आजपासून मुंबईतील आझाद मैदान येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणास बसले आहेत. आपल्या हजारो समर्थकांसहीत आज पहाटे मुंबईत दाखल झाल्यानंतर जरांगेंनी मराठा समाजाला न्याय मिळवून देईपर्यंत आपण इथून हटणार नाही. आपला प्राण गेला तरी चालेल पण माथ्याला गुलाल लावूनच परत येणार असा शब्द जरांगेंनी समर्थकांना दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय हा मागील अनेक दशकांपासून चर्चेत आहे. मात्र मराठा समाज म्हटल्यानंतर आजही अनेकांचा गोंधळ होतो. त्यातही मराठा आणि 96 कुळी मराठा यात काय फरक आहे? असा प्रश्न तर बहुमतांशी लोकांना पडतो. आजच्या आंदोलनानिमित्त यावरच प्रकाश टाकूयात…
मराठा म्हणजे काय?
मराठा हा एक व्यापक समाजसमूह आहे असं म्हणता येईल. तर ’96 कुळी मराठा’ हे मराठा समाजातील विशिष्ट 96 वंशांच्या गटाला उद्देशून बोललं जातं. मराठा समाजात अनेक आडनावे असली तरी, काही आडनावे विशिष्ट 96 कुळांमध्येच येतात, त्यांनाच 96 कुळी मराठा म्हणतात. मराठे प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय करणारा समाज आहे, असं मानलं जातं. मराठा हे प्रामुख्याने श्रत्रिय असल्याचं मानलं जातं.
96 कुळी मराठा म्हणजे? आणि 96 आकडा आला कुठून?
’96 कुळी मराठा’ हा मराठा समाजातील एका विशिष्ट गट आहे. या 96 कुळांमध्ये यादव/जाधव, सोलंकी/सोळंके, चव्हाण, मोरे आणि भोसले यांसारख्या काही प्रमुख आडनावांचा समावेश आहे. वर नमूद केल्याप्रमाणे मराठे हे क्षत्रिय असून क्षत्रिय समाजात सोमवंश आणि सुर्यवंश असे दोन प्रमुख वंश आहेत. तसेच क्षत्रिय समाजातील महाराष्ट्रातील मराठी असलेल्या काही कुळांनी एकत्र येउन आपल्या वंशाचा इतर कुळांशी संपर्क होऊ नये म्हणून व्यवहार आणि कुठल्याही प्रकारची सोयरिक उपस्थित क्षत्रिय कुळांच्या बाहेर न करण्याचे बंधन घातले. पुढे बऱ्याच प्रमाणात ही तत्त्व पाळली ही गेली. त्या वेळी त्या एकत्र आलेल्या कुळांची संख्या 96 होती म्हणून ही कुळे स्वतःला 96 कुळी मराठा असे संबोधू लागले. या कुळांना बऱ्याच शतकांपासून राजवंशाची मान्यता मिळालेली आहे. 96 कुळे ही आडनावे आहेत. अनेकदा ही आडनावं गावांची नावे, व्यवसाय किंवा पूर्वी मिळलेली पदवी अशा स्वरुपातून जन्माला आलेली असतात. म्हणूनच आपलं मूळ म्हणजेच खरे आडनाव (कुळी) स्वतःला माहीत असणे व आपल्या पुढच्या पिढ्यांना माहीत करुन देणे हे आपले कर्तव्य आहे असे या कुळातील लोक मानतात.
3487 आडनावे स्वत:ला 96 कुळी मराठे मानतात
जवळ जवळ 3487 आडनावे शोधली गेली आहेत जी स्वत:ला 96 कुळी मराठे मानतात. अहिर, भाती, भोसले, चालुक्य, चव्हाण, चंदेला, गायकवाड, गुज्जर, कादंबास, काकतीय कलचुरी, चेदीवंशीय, मराठा मौर्य (मोरे), नाला निकुंब, निकम, पल्लव परिहार, पवार पाल्मर, राष्ट्रकुट शंखपाल, संकपाळ, सावेकर, सातवाहन सिंदिया, शिंदे, सिल्हारा सिसोदिया साळुंके, ठाकोरे, वाघेला, वात्कारा, यादव इत्यादी कुळातील लोक स्वत:ला 96 कुळी मराठा मानतात असा उल्लेख ’96 कुळी मराठा मॅरेज डॉट कॉम’वर आहे.
96 कुळी मराठे लग्न ठरवताना…
96 कुळी मराठ्यांमध्ये लग्नासाठी कुळ महत्वाचे असते. त्यामध्ये काही ठराविक आडनावाच्या मराठ्यांचे दुसऱ्या ठराविक आडनावाच्या मराठ्यांशी व्यवहार अथवा सोयरिक होत नाही. त्यामुळे या कुळातील लग्न ठरविताना आडनाव आणि गाव महत्वाचे असते. आजच्या बदलत्या जगात, 96 कुळी मराठा समाज देखील बदलत आहे. शिक्षण, रोजगार आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा या समाजावर मोठा प्रभाव पडला आहे. आजही, काही कुटुंबांमध्ये लग्नासाठी कुळ आणि गोत्राचा विचार केला जातो, परंतु अनेक कुटुंबांमध्ये शिक्षण, संस्कार आणि गुणधर्म हे लग्नाच्या प्रमुख घटक मानले जातात.
96 कुळांची यादी
अहीर-राव(अहीरराव) ,आंग्रे, आंगन (आंगने), बागवे, बागराव, बांडे, बाबर , भागवत, भोसले, भोवारे, भोगले, भोईटे, बिरादार चालुक्य (चालके ), चव्हाण, ढमाले, ढमढेरे, धीतक, ढवळे, ढेकळे, ढोणे, ढोले, दरबारे, दळवी, देवाडे॔, दाभाडे, धर्मराज, देवकाते, धायबर, धुमाळ, इंगळे, गुंड, गव्हाणे, गुजर (गुर्जर) , गुज्जर, गायकवाड, गंगाईक, घाटगे, हंडे, हरफळे, हारू, जाधव,(यादव), जगदाळे, जगधने, जगताप, काळे, कालमुख / कलमकार, कलचुरी (कचरे, चेदी), काकडे, कदम, खंडागळे, खडतरे, खैरे, कोकाटे, लाड, मधुरे, मालपे, माने, मालुसरे, महाडीक, म्हाम्बर , मुळीक , मोरे (मौर्या), मोहीते, नलावडे, नालंधिरे, निकम, निसाळ, पवार /(पोंवार ,परमार), प्रतिहार, परिहार, पानसरे, पांढरे, पाठारे, प्रोक्तात, पालवे, पल्लव, पलांढ, पिंगळे, पिसाळ,फडतरे, फाळके, फाकडे, फाटक, राठोड (राष्ट्रकुट), चंदेले (चंदेला), राणे, राऊत, रेणुसे, शिलाहार, शेलार, शंखपाळ (संकपाळ), शिंदे, शितोळे, शिर्के,साळवे (साळवी), सातवाहन, सावंत, साळूंखे( सालुंके,सोलंकी) , सांभारे, शिसोदे( सिसोदिया), सुर्वे, क्षीरसागर, ठाकुर, तायडे, तावडे, तोंवर, तुवर, तोमर(तावरे ), तेजे, थोरात, थोटे, विचारे, वाघमारे, वाघळे.
थोडक्यात फरक…
अगदी थोडक्यात फरक सांगायचा झालं तर मराठा या व्याखेअंतर्गत व्यापक समाजाचा समावेश होतो. तर 96 कुळी मराठा हा या समाजातील एक गट आहे जो लग्न आणि परंपरांसंदर्भात काही विशिष्ट नियमांचं पालन करतो.
FAQ
मराठा म्हणजे काय?
मराठा हा महाराष्ट्रातील एक व्यापक समाजसमूह आहे, जो प्रामुख्याने शेती व्यवसायाशी निगडित आहे आणि क्षत्रिय वर्णाशी संबंधित मानला जातो. मराठा समाजात अनेक आडनावे असतात, ज्यामध्ये 96 कुळी मराठा हा एक विशिष्ट गट आहे.
96 कुळी मराठा म्हणजे काय?
96 कुळी मराठा हा मराठा समाजातील 96 विशिष्ट क्षत्रिय वंशांचा गट आहे. या कुळांनी स्वत:च्या वंशाची शुद्धता राखण्यासाठी इतर कुळांशी सोयरीक किंवा व्यवहार न करण्याचं बंधन घातलं होतं. यामुळे त्यांना 96 कुळी मराठा म्हणतात.
96 कुळी मराठ्यांमधील ‘96’ आकडा कुठून आला?
मराठा समाजातील काही क्षत्रिय कुळांनी (सोमवंश आणि सूर्यवंश) आपल्या वंशाची शुद्धता राखण्यासाठी इतर कुळांशी सोयरीक न करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी एकत्र आलेल्या कुळांची संख्या 96 होती, म्हणून त्यांना 96 कुळी मराठा म्हणतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.