
Watchmen Insults Marathi In Mumbai: मुंबईतील पवईमधील साकी विहार रोडवरील निवासी संकुलात एका सुरक्षारक्षकाने मराठी भाषेचा अपमान केल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी ‘मराठी गेली तेल लावत’ असं म्हणणाऱ्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली. यानंतर मारहाण झालेला सुरक्षारक्षक भवानीप्रसाद झा (40) याने नोदवलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत.
भाषेच्या मुद्द्यावरून हाणामारी
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बँकांमध्ये मराठीचा सक्तीने वापर व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते. त्यानंतर, मनसे कार्यकर्ते सातत्याने बँकांमध्ये जाऊन मराठीत व्यवहार करण्याची पाहणी करण्याचे आदेश दिलेले. त्याचवेळी पवईतील एका सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.
वाद कशामुळे सुरू झाला?
मूळचा बिहारमधील दरभंगा येथील असलेला भवानीप्रसाद झा अंधेरी पूर्वेच्या मरोळ पाईपलाईन परिसरात वास्तव्यास आहेत. त्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, स्टेल्थ मॅनेजमेंट सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत तो मागील चार वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या आपण एल अँड टी एमराल्ड निवासी संकुलात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहोत. 31 मार्च रोजी रात्री कामावर असताना, एका डिलिव्हरी बॉयशी वाद झाला, असं तक्रारदार सुरक्षारक्षकाने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. अजिंक्य असे या डिलिव्हरी बॉयचे नाव असून, तो ऑर्डर डिलिव्हरीसाठी आला होता. झा यांनी त्याच्याशी हिंदीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे अजिंक्य नाराज झाला. ऑर्डर पूर्ण केल्यानंतर अजिंक्यने आपल्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या तरुणाने मराठी बोलण्याची मागणी करत आपल्याला शिवीगाळ केली आणि जबरदस्तीने मराठीत बोलण्यास सांगितले, असं तक्रारदाराने म्हटलं आहे.
मनसेच्या सहकाऱ्यांसहीत येऊन केली मारहाण
वाद वाढत गेल्याने सुरक्षारक्षकाने मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अजिंक्य संतप्त झाला आणि तो काही वेळाने विजय निकम, संजय मुले आणि महेश गिरम या तीन सहकाऱ्यांसोबत परतला. या चौघांनी मिळून सुरक्षारक्षकाला मारहाण केली आणि जबरदस्तीने त्यांच्याकडून माफी मागवून घेतली, असं तक्रारीत म्हटलं आहे.
हा सुरक्षारक्षक नेमकं काय म्हणाला?
मराठीत बोल माझ्याशी. मला हिंदी येत नाही, असं मराठी डिलेव्हरी बॉयने म्हटल्यानंतर या वॉचमनने, ‘क्यो जरुरी है मराठी सिखना?’ असा प्रश्न विचारला. त्यावर या तरुणाने काय गरज आहे म्हणजे? असं विचारलं. त्यावर या वॉचमनने, ‘मराठी गया तेल लगाने’ असं विधान केल्यावर हा तरुण चांगलाच संतापला आणि त्याने मी दाखवतो तुला मराठीची औकात काय आहे, असं म्हणून निघून गेला. त्यानंतर तो सहकाऱ्यांना घेऊन आला त्याने सुरक्षारक्षकाला मारहाण केली.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेनंतर भवानीप्रसाद झा याने पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अजिंक्य आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. या साऱ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तो व्हिडीओ असून त्याद्वारे पवई पोलीस तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.