
Women MP From Maharashtra Vs BJP’s Nishikant Dubey In Parliament: राज्यातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादात विनाकारण उडी घेऊन ‘मराठी माणसा’ला डिवचणारे भारतीय जनता पार्टीचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबेंना बुधवारी मराठी खासदारांनी धडा शिकवल्याचं चित्र पाहायला मिळालं. संसद भवनात त्यांना अचानक गाठून घेराव घालत वादग्रस्त विधानांचा जाब विरोधी पक्षांच्या महिला खासदारांनी विचारला. ‘जय महाराष्ट्र’ च्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणाणून गेली अन् दुबे यांना तेथून चक्क काढता पाय घ्यावा लागला.
वादाची पार्श्वभूमी काय?
राज्यामध्ये पहिल्या इयत्तेपासून त्रिभाषासूत्रीच्या माध्यमातून हिंदी लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांपैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि राज ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर 5 जुलै रोजी हिंदीच्या सक्तीविरोधात मुंबईत दोन्ही ठाकरे बंधुंच्या पक्षाने संयुक्त मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषासूत्रीचा शासन आदेश मागे घेत असल्याची घोषणा केली. यानंतर पाच जुलै रोजी वरळीमधील डोम येथे झालेल्या संयुक्त जल्लोष मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मराठीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. याच मेळाव्यावर बोलताना दुबेंचा तोल सरकला आणि त्यांनी मराठी तसेच महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त विधानं केली.
दुबे काय म्हणालेले?
जाणूनबुजून मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीयांविरोधात राज्यात वातावरण तापले असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बिहारला यावे, तेथे त्यांना ‘पटक-पटक के मारेंगे’ असे आव्हान दुबे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिले होते. ‘महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो’ अशी दर्पोक्तीही दुबेंनी केली होती. याच दुबेंना बुधवारी मराठी महिला खासदारांनी खिंडीत गाठले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार दुबे यांना शोधत होत्या. दुबे लॉबीमध्ये येताच तिघींनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या विधानांबाबत जाब विचारला.
महिला खासदार दुबेंना काय म्हणाल्या?
“मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसली ही तुमची अर्वाच्च भाषा ? तुमचे वागणे-बोलणे योग्य नाही… मराठी भाषकांविरोधातील तुमची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही” अशा शब्दांत गायकवाड यांनी दुबेंना सुनावले. यानंतर या महिला खासदारांनी ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या साऱ्या प्रकारामुळे दुबे गोंधळून गेले आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.