
Manoj Jarange Mumbai Morcha: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील मुंबईत मोर्चा घेऊन येणार असल्यासंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला नव्याने माहिती द्यायची गरज नाही. विधानसभा निवडणुकांआधी सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. पुन्हा सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा विषय संयमाने सहानुभूतीने आणि शब्दाला जागून पूर्ण करावा एवढीच आमची अपेक्षा. यापेक्षा जास्त मी बोलणार नाही,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी नोंदवली आहे.
कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकतं तर…
“मुंबई ही मराठी माणसाची आहे .मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे. मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. लोक जर कबुतरांसाठी आंदोलन करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देते तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची अधिकार आहे. मग ते कोणीही असो! या मुंबई शहरात कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकते मग मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यासाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानीत आंदोलन करत असेल तर त्यात गैर काय? ही राजधानी मराठी माणसाची आहे. त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल तर मुख्यमंत्री यांनी आंदोलकांशी संवाद साधने गरजेचे आहे. गणपतीमध्ये मुंबई कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
मराठी माणसाची एकजूट टिकवू नये राहू नये म्हणून फडणवीसांनी राजकारण केलं
“राजकारण आम्ही करत नाही. राजकारण जे आहे जाती-जातीमध्ये भेदाभेद करण्याचे काम गेल्या 10 वर्षात जास्त झालं. तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील जाती जातीचे तुकडे पाडायचे काम करतात. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट या मुंबईत महाराष्ट्रात उभारली. मराठा, ब्राह्मण, घाटी, कोकणी, 92 कुळी, 96 कुळी जो एक मंत्र दिला त्या मंत्राच्या टेकड्या उडव्याचं काम गेल्या 10 वर्षात प्रामुख्याने झालं. मराठी माणसाची एकजूट टिकवू नये राहू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण केलं. त्यांनी केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण केलं.” असा घणाघाती आरोप राऊतांनी केला.
जरांगे ट्रम्प यांच्याकडे मागण्या करु शकत नाहीत
“आज जातीजातीमध्ये आग लागली आहे असं चित्र कधी नव्हतं. हे या राज्याचे दुर्दैव आहे. रोज कुठे ना कुठेतरी जात विरुद्ध जात असा संघर्ष पेटल्याची बातमी ही आमच्यासारख्या हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ज्यांनी मराठी एकजुटीसाठी काम केलं त्यांच्यासाठी वेदनादायक आहे,” असंही राऊत म्हणाले.
“मनोज जरांगे पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात समाज आहे. त्यांच्या समाजाच्या काही मागण्या आहेत. रोजगारासंदर्भात, आर्थिक अडचणीसंदर्भात ते सरकारकडे मागणी करणार आहेत. ते प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडे काही मागू शकत नाही किंवा फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे मागण्या मागू शकत नाही. ते नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस जे राज्याचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आहेत. उद्या जर तुम्ही मुख्यमंत्री नसाल किंवा दुसरा मुख्यमंत्रीकडे त्याच्याकडे मागण्या मागतील. उद्या प्रधानमंत्री मोदी नसतील दुसरे कोणतेही असतील तर त्यांच्याकडे मागणी मागतील व्यक्तीकडे मागत नाही तुम्ही त्यांचे पालक आहात. तुमच्याकडे जर काही मागण्या घेऊन लोक मुंबईकडे आले आहेत तर तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल,” अशी आठवण राऊतांनी करुन दिली.
FAQ
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई मोर्चा कशासाठी आहे?
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी 27 ऑगस्ट 2025 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून मुंबईकडे मोर्चा काढत आहे. हा मोर्चा 29 ऑगस्ट 2025 रोजी आझाद मैदानावर पोहोचणार असून, तिथे जरांगे बेमुदत उपोषण करणार आहेत. त्यांची प्रमुख मागणी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि ‘सगे-सोयरे’ धोरणाची अंमलबजावणी व्हावी, अशी आहे.
संजय राऊत यांनी मराठी माणसाच्या आंदोलनाबाबत काय म्हटले?
राऊत यांनी म्हटले की, मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाला त्याच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांनी उपरोधिकपणे सांगितले की, जर कबुतरांसाठी आंदोलनाला परवानगी मिळू शकते, तर मराठा समाजाला त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करण्यापासून का थांबवावे? गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची गरज असली तरी सरकारने आंदोलकांशी संवाद साधावा, असे त्यांनी सुचवले.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणता आरोप केला?
राऊत यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला की, गेल्या 10 वर्षांत त्यांनी जाती-जातींमध्ये भेद निर्माण करून मराठी माणसाची एकजूट तोडण्याचे राजकारण केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठा, ब्राह्मण, घाटी, कोकणी आणि 92-96 कुळी मराठी माणसांना एकत्र आणणारा मंत्र दिला होता, परंतु फडणवीस यांनी सत्ता मिळवण्यासाठी जातींमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप राऊत यांनी केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.