
Dharashiv Hotel Bhagyashree: धाराशिव जिल्ह्यातील कायम प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या रील स्टार हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांचं चार ते पाच जणांनी अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केली आहे. इतकंच नव्हे तर मारहाणीनंतर त्यांना चालत्या गाडीतून फेकून देण्यात आलं आहे. नागेश यांच्यावर सध्या धाराशिव शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागेश हे काल सायंकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हॉटेल समोर उभे होते. त्यावेळी चार चाकी वाहनातून आलेल्या पाच जणांनी त्यांना बळजबरीने गाडीत बसून बेदम मारहाण केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरुये.
नेमकं काय घडलं?
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे बुधवारी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नागेश मडके हे त्यांच्या हॉटेलसमोर उभे होते. त्यावेळी एक चारचाकी तिथे आली. त्या गाडीतील लोकांनी सेल्फी घेण्याच्या बहाण्याने नागेश मडके यांना बोलावून घेतले. मडके हे कारजवळ गेले असता त्यांनी गाडीच्या खिडकीमध्ये अडकवून त्यांचे अपहरण करण्यात आले, असा दावा त्यांनी केला आहे.
अपहरणकर्त्यांनी त्यांना पाच किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. यावेळी त्यांना बेदम मारहाणही करण्यात आली. ह्याला मारून टाकू, मरेपर्यंत सोडायचे नाही. त्याला मारून टाकायचं अन् पुलात फेकून द्यायचं, अशी धमकी ते देत होते असा दावा नागेश यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर, आरोपींनी त्यांना पुढे वडगावच्या पुलावर फेकून दिले, असा खळबळजनक दावा स्वतः भाग्यश्रीचे मालक नागेश मडकेंनी केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने हॉटेलसमोर बाउन्सर ठेवले होते. त्यामुळंदेखील हे हॉटेल चर्चेत आले होते. सोशल मीडियावर या हॉटेलचे अनेक रिल्स व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच हॉटेल भाग्यश्री या नावाने असलेल्या हॉटेल चालकाने बायकोला नवी कोरी फॉर्च्युनर गाडी गिफ्ट केली होती.
हॉटेल भाग्यश्री इतकं फेमस का झालं?
नाद करती का यावं लागतं, एक नंबर क्वालिटी, एक नंबर क्वांटिटी, असं म्हणत हॉटेल भाग्यश्रीचे मालक सोशल मीडियावर हॉटेलची जाहिरात करतात. हे रील सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसतात. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधील हे हॉटेल व्यवसायिक आहेत. हॉटेल भाग्यश्रीची सोशल मीडियावर खूप क्रेझ आहे. दररोज हॉटेलची गर्दी, कापलेल्या बोकडांची संख्या सांगत ते आपल्या व्यवसायाची अपडेट देत असतात. त्यांची हीच हटके अन् खास स्टाईल नेटकऱ्यांना प्रचंड आवडली असून त्यांच्या रिल्सला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.