
लग्न, नवीन संसार सुरु झाला की, एकमेकांना आणाभाका देणं आलंच. प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा थोड्या फार फरकाने कमी जास्त असतात. अशाच अपेक्षांच्या ओझाखाली 40 दिवसांपूर्वी सुरु झालेला संसार कोलमडून गेला आहे.
बीड जिल्ह्यातील केतुरा येथे किरकोळ वादावरुन नवविवाहित दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. 21 वर्षीय शुभांगी गालफाडे आणि 27 वर्षीय अक्षय गालफाडे अशी आत्महत्या केलेल्या जोडप्यांची नावे आहेत. नवदाम्पत्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून गुरुवारी दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
बीडच्या केतुरा येथील 27 वर्षीय अक्षय गालफाडेचा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात 21 वर्षीय शुभांगीसोबत लग्न झालं. 40 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या अक्षयची सुट्टी संपली आणि तो पुण्याला निघाला. लाईट फिटिंग काम करणारा अक्षय सुट्टी संपवून 2 एप्रिल रोजी पुन्हा निघाला.
नवविवाहित पत्नी शुभांगी अक्षयकडे मलाही पुण्याला सोबत ने असा हट्ट करु लागली. मी आधी पुण्यात जातो भाड्याने घर घेतो मग तू ये, अशा शब्दात अक्षय शुभांगीची समजूत घालत होता. पण शुभांगी ऐकायला तयार नव्हती. ‘मला सोबत ने नाहीतर जीव देईन’, अशी धमकी देत शुभांगीने टोकाचं पाऊल उचललं.
अक्षय पुण्याला जायला बसमधून निघाला. तो नवगण राजुरीजवळ पोहोचला असेल आणि शुभांगीने त्याला व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉल करुन शुभांगीने गळफास लावून घेतला. हा सगळा प्रकार बघून अक्षय तातडीने माघारी फिरला. घरी येताच होत्याचं नव्हतं झालं होतं. शुभांगीचा मृतदेह शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता.
यावेळी शुभांगीच्या कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतला. 40 दिवसांपूर्वी लग्न अन् पत्नीची आत्महत्या आणि कुटुंबातील वाद या सगळ्याने निराश झालेल्या अक्षयने शेतात जाऊन गळफास लावून जीव दिला. गुरुवारी दुपारी अक्षय आणि शुभांगी यांच्या पार्थिवावर केतुरा गावंत अंत्यविधी करण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.