digital products downloads

महापौर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? अनिल परबांचा संताप: भरतीवरून वाद पेटला; म्हणाले- प्रकरण अंगाशी आलं की निर्णय मागे – Mumbai News

महापौर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? अनिल परबांचा संताप:  भरतीवरून वाद पेटला; म्हणाले- प्रकरण अंगाशी आलं की निर्णय मागे – Mumbai News



महापालिकेतील भरतीप्रकरणावरून राजकारण तापले असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महापालिकेतील 120 पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मात्र त्यानंतर महापौर रितू तावडे यांनी ही भरती अंमलात आणण्यासाठी प्रशासनाला पत्र पाठवल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी सरकारला लक्ष्य करत थेट सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला असताना महापौरांनी तो उठवला, म्हणजे महापौर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अनिल परब सिडकोमधील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी या भरतीप्रकरणाचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भरती प्रक्रियेत काहीतरी संशयास्पद असल्याची जाणीव झाल्यामुळेच त्यांनी तत्काळ स्थगिती दिली होती. मात्र त्यानंतर महापौरांनीच त्या निर्णयावर पाणी फेरत प्रशासनाला पत्र पाठवले. प्रकरण अंगाशी येऊ लागले की लगेच निर्णय मागे घेतले जातात, अशी टीकाही त्यांनी केली. या प्रकारामुळे प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले. उल्हासनगर महापालिकेच्या काही प्रकरणांचाही परब यांनी सभागृहात उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, अनेक गंभीर मुद्दे त्यांनी सभागृहात मांडले असले तरी त्यावर योग्य ती चौकशी होत नाही. एखाद्या अहवालात दोषी आढळूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. गुन्हा सिद्ध झाला तरी नेमकी कारवाई काय झाली? असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. चौकशी समित्या नेमल्या जातात, मात्र पुढे कोणतीही ठोस कारवाई होत नाही, असेही ते म्हणाले. मुंबई महापालिकेशी संबंधित ग्लोबल हॉस्पिटलच्या मुद्द्यावरही अनिल परब यांनी सरकारला धारेवर धरले. महापालिकेच्या सुविधा घेतलेल्या या रुग्णालयात 28 बेड मोफत उपलब्ध असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात रुग्णांना या सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. या बेडच्या माध्यमातून जवळपास सहा कोटी रुपयांचे उत्पन्न रुग्णालय कमावत असल्याचा दावा त्यांनी केला. एक रुग्ण पाठवून बघा, त्याला दाखल करून घेतात का ते पाहा, असे आव्हान त्यांनी सभागृहात दिले. या रुग्णालयाचे कंत्राट आणि परवाना रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याचा आरोप याशिवाय विकासाच्या नावाखाली अनेक अनियमित प्रकार सुरू असल्याचा आरोपही परब यांनी केला. विमानतळ उभारणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले असून पनवेल, खारघर, कर्जत, खालापूर, पाली आणि म्हसला परिसरात बेकायदेशीर खाणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण विभागाने फारच कमी परवानग्या दिल्या असताना मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात ‘स्वराज’ नावाची कंपनी माल विक्रीचे दर ठरवत असल्याचा दावा त्यांनी केला. शासनाचे कोट्यवधी रुपये थकले असून अनेक कंपन्यांनी रॉयल्टी आणि कर भरलेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. शासनाचे पैसे बुडवणाऱ्यांकडून वसुली करण्याची हिंमत कोणामध्ये आहे? असा सवाल करत त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली. तसेच अंधेरी पूर्वेतील काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या विरोधात कारवाईची मागणीही त्यांनी पुन्हा एकदा सभागृहात केली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp