
Sandeep deshpande And Varun Sirdesai: मराठी शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र मोर्चा काढणार आहे. दोन्ही पक्षांनी आपण जाहीर केलेल्या तारखांमध्ये बदल केला असून, आता 5 जुलैला हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदीसक्तीवरुन सत्ताधाऱ्यांविरुद्ध विविध पक्ष, संघटना एकत्र येणार आहेत. या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका मंचावर असतील. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची दादरच्या हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान 5 जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात ही भेट झाल्याचे कळते.
मराठी माणसासाठी सर्व एकत्र येतायत ही ऐतिहासिक गोष्ट आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर अशी घटना पहिल्यांदाच घडतेय, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
राज-उद्धव भेटीवर काय म्हणले राऊत?
“राज ठाकरेंनी याबाबत एक कडवट भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरेंनीही ती भूमिका मांडली आहे. मराठीचा विषय असल्याने, मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्याने उद्धव ठाकरेंनी तात्काळ पत्रकार परिषद घेत कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तुमच्या लढ्याला, आंदोलनाला पाठिंबा आहे असं जाहीर केलं. त्याचवेळी राज ठाकरेंकडे सरकारचे काही लोक केले. राज ठाकरेंना ते सादरीकरण मान्य नसावं. आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असताना राज ठाकरेंनीही मोर्चाची घोषणा केली. आम्ही आत असल्याने त्याची कल्पना नव्हती,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंचा मला फोन आला. मराठी माणसाचे, मराठी भाषेसंदर्भात दोन मोर्चे निघणं बरं दिसत नाही, एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना आनंद होईल असं त्यांनी सांगितलं. मी उद्धव ठाकरेंशी चर्चा करतो असं सांगितलं. मी पुन्हा मातोश्रीवर जाऊन राज ठाकरेंशी बोलणं झाल्याचं आणि त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितलं. त्यावर काही आडंवेडं न घेता उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाचं ऐक्य दिसणं महत्त्वाचं आगे असं सांगितलं. आपण सगळे मराठी माणसं सक्तीविरोधात एकत्र आहोत आणि वेगळा मोर्चा काढण्याची माझ्या मनात भूमिका नाही असं ते म्हणाले”.
मोर्चाची तारीख
“उद्धव ठाकरेंनी सांगितलं, 6 तारखेला आषाढी असल्याने आपण 7 तारीख ठरवली होती. सगळीकडे आषाढीचा उत्साह असताना मराठी माणसांपर्यंत पोहोचणं अडचणीचं जाईल. आपण एकत्र करणार असू तर काही अडचण नाही. 7 तारखेत त्यांनी सहभागी व्हावं किंवा 5 तारीख करावी असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानुसार राज ठाकरेंशी चर्चा केली आणि उद्धव ठाकरेंशी झालेलं बोलणं सांगितलं. मग त्यांनीही 5 तारखेवर संमती दर्शवली,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. “हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल. 5 तारखेला सकाळची 10 ची वेळ सोयीची नाही. तसंच कुठून कुठपर्यंत जायचं त्यावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक सहभागी होणार असल्याने वेळेत बदल करु. त्यासंदर्भात राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करु. मुंबई आणि महाराष्ट्रावर ज्याप्रकारे अतिक्रमण सुरु आहे त्यासंदर्भात भूमिका घेताना आम्ही मराठी माणसात संघर्ष, फूट नाही याची काळजी घेऊ,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.