
Shivsena Dasara Melava 2025 : शिवसेना UBTअजूनही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. दसरा मेळावा काही दिवसांवर आला असताना पालिकेकडून अजून निर्णय न झाल्याने शिवसेना UBTची चिंता काहीशी वाढली आहे. ठाकरेंच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये अर्ज केला असताना अजून त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही.अशातच शिवसेना दसरा मेळाव्याचे राज ठाकरे यांना निमंत्रण दिले नसल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतल्या दादर मधील शिवाजी महाराज मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने हा मेळावा होणार असून त्यासाठी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागण्यात आली आहे.पालिकेने अद्याप परवानगी दिली नसली तरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दसरा मेळाव्यालाही एकत्र येण्याच्या चर्चां रंगू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून अजून दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांना आमंत्रण आल्याची माहिती नसल्याचे मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी झी २४ तास शी बोलताना म्हटले आहे. जायचं की नाहीं याचा निर्णय राज ठाकरे घेतील असही अभ्यंकर यांनी म्हटलं आहे.
शिवसेना उबाठा पक्षाच्या काही नेत्यांच्या मते हे बंधू दसरा मेळाव्यासाठी एकत्र येतील. तर काही नेत्यांच्या मते दसरा मेळावा हा शिवसेनेचा असल्याने राज ठाकरे मेळाव्याला येणार नाहीत. मात्र तरीही दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मात्र ठाकरे बंधू दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू राजकीय युतीची घोषणा करणार की नाही याबाबतचे गूढ अद्याप उकलले नसले तरी वाढदिवस तसेच गणेशोत्सवाप्रमाणे हे बंधू आता दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येणार का, याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरे बंधूंच्या या भेटीगाठीचे सत्र आणखी पुढे जावे यासाठी आता हे बंधू आगामी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानावर एकत्र यावेत अशी अपेक्षा दोन्हीकडचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. यालाच दुजोरा देताना शिवसेना उबाठा पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी एक विधान केले आहे. ‘येत्या दसरा मेळाव्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल, कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते’, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, याच मुद्द्यावर शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र वेगळी प्रतिक्रिया नोंदवली.
हिंदीसक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू मेळाव्याच्या निमित्ताने सर्वप्रथम एकत्र आले. तेथूनच हे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेला तोंड फुटले. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला थेट मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच्या पुढचे पाऊल म्हणून उद्धव ठाकरे सहकुटूंब गणेशदर्शनासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले.
‘दसरा मेळाव्यात हे दोघे एकत्र येण्याबाबत मला काहीच माहिती नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंचा गुढीपाडव्याला दुसरा वेगळा मेळावा असतो. आमची विचारसरणी मराठी माणसांसाठी एक आहे. मात्र दोन्ही पक्ष वेगळे असल्याने तसे होणे शक्य नाही. दोन्ही पक्षाचे मेळावे वेगळे होतात. भविष्यामध्ये काम करण्यासाठी एकत्र येण्याबाबत आमचे एकमत झाले आहे असे संजय राऊत म्हणाले.
FAQ
1शिवसेना (UBT) चा दसरा मेळावा 2025 कुठे होणार आहे?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा दसरा मेळावा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानात होणार आहे.
2 शिवाजी पार्कसाठी परवानगी मिळाली आहे का?
नाही, मुंबई महापालिकेकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. शिवसेना (UBT) ने जानेवारी 2025 मध्ये अर्ज केला होता, परंतु निर्णय प्रलंबित आहे. तरीही परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
3 दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे का?
मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांच्या म्हणण्यानुसार, अद्याप राज ठाकरे यांना शिवसेना (UBT) कडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण मिळालेले नाही.
4 उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत का?
याबाबत स्पष्टता नाही. काही शिवसेना (UBT) नेत्यांच्या मते, ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, तर काहींच्या मते राज ठाकरे येणार नाहीत, कारण दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे. मात्र, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्या एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.