
Union Agriculture Minister on Flood In Maharashtra: अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला नाही, अशी माहिती कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. केंद्रीय कृषिमंत्र्यांचं हे विधान राज्य सरकारने केलेल्या दाव्यांच्या अगदी विरोधात असल्याचं सांगितलं जात आहे. अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती; परंतु महाराष्ट्र सरकारने केंद्राला एक लाख 10 हजार 309 हेक्टर शेती नष्ट झाल्याचे सांगितले आहे.
मदतीबद्दल काय म्हणाले केंद्रीय कृषिमंत्री?
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना 4176.80 कोटींची मदत केली आहे. यात केंद्राचा वाटा 3132.80 कोटी रुपयांचा असून हा निधी 1566.40 कोटींच्या दोन टप्प्यांत राज्याला देण्यात आला आहे.
एकूण प्रभावित शेतकरी – 1,25,602 हेक्टर
नष्ट झालेली शेती – 1,10,309 हेक्टर
मृत व्यक्ती – 224
मृत जनावरे – 599
कृषिमंत्री भरणे म्हणाले…
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यांच्या 191 तालुक्यातील 14 लाख 36 हजार हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती दिली; परंतु केंद्राला दिलेल्या माहितीत केवळ एक लाख 10 हजार 309 हेक्टरमधील शेती नष्ट झाल्याचे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना 82 कोटी 27 लाखांची मदत
काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर, उद्धवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि खासदार संजय देशमुख यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. गृह मंत्रालयाने अतिवृष्टी नुकसान पाहणीसाठी 16 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय मंत्र्यांचे पथक नेमले होते. 1,13,455 शेतकऱ्यांना 82 कोटी 37 लाख 50 हजार 48 रुपयांची मदत करण्यात आली आहे, असे कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर म्हणाले.
कुठे कुठे झालं नुकसान?
जून-ऑक्टोबर या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाने शेती, पायाभूत सुविधा आणि दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम केला. प्रभावित क्षेत्रातील सोयाबीन, मका, द्राक्ष, कांदा, ऊस यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान. मराठवाड्यातही मोठं नुकसान झालं. या ठिकाणी अनेक गावं पाण्याखाली गेली, पूल-रस्ते बुडाले होते. 11500 हून अधिक लोकांना विस्थापित करण्यात आलं. नाशिक, रत्नागिरी आणि सांगलीमध्ये अनेक नद्यांना पहिल्यांदाच पूर आला. या पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर कर्जमाफी, एमएसपी आणि नुकसान भरपाईसाठी नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलनं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



