
Forts In Maharashtra World Heritage List UNESCO : संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा समावेश असून, तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्याचाही यात समावेश आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे. हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले. सर्वप्रथम मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली. मी स्वत: विविध राजदुतांशी संपर्क केला. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली. माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वत: जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली. तेथे तांत्रिक सादरीकरण केले. माझ्या कार्यालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते. अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे. मी पुन:श्च महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.
॥ छत्रपती शिवाजी महाराज की जय ॥ अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.