
IPS Officer Sudhakar Pathare Death: महाराष्ट्राचे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचं अपघाती निधन झालं आहे. सुधार पठारे यांच्यासह त्यांचे सहबंधू भगवत खोडके यांचं तेलंगणातील श्रीशैलम, नागरकुरनूल येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झालं. शनिवारी हा अपघात झाला असून, नागरकुरनूलचे पोलीस अधीक्षक वैभव गायकवाड (IPS) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून ते कर्तव्य बजावत होते. ट्रेनिंगसाठी ते हैदराबादमध्ये गेले असता हा अपघात झाला. सुधाकर पठारे त्यांच्या नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना कारची ट्रकसोबत धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुधाकर पठारे यांच्यासोबत यावेळी त्यांचे बंधूही होते. त्यांनाही आपली जीव गमवावा लागला. तेलंगणा पोलिसांनी मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
मुंबई बंदर परिमंडळ पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांचे आज हैदराबादजवळ झालेल्या दुर्दैवी रस्ता अपघातात अकाली निधन झाले.
डॉ. सुधाकर पठारे हे एक निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होते. सध्या बंदर परिमंडळ मुंबई येथे तसेच यापूर्वी नवी मुंबईत त्यांनी कायदा व सुव्यवस्था… pic.twitter.com/p1tWh2x2p7
— पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई – CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) March 29, 2025
सुधाकर पठारे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळवणे येथील होते. एम.एस्सी. अॅग्री, एलएलबी असं त्यांचं शिक्षण झालं होतं. आयपीएस अधिकारी होण्याआधी त्यांनी जिल्हा विशेष लेखा परीक्षक, विक्रीकर अधिकारी म्हणूनही काम केलं. 1998 साली ते पोलीस उपअधीक्षक झाले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत त्यांनी सेवा बजावली.
मुंबई पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला शोक
मुंबई पोलीस आयुक्तांच्या वतीने उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करत त्यांनी लिहिले की, “मुंबई पोर्ट सर्कलचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांचे आज हैदराबादजवळ झालेल्या एका रस्ते अपघातात अकाली निधन झालं. डॉ. सुधाकर पठारे हे एक निष्ठावंत आणि समर्पित पोलिस अधिकारी होते. पोर्ट सर्कल मुंबई तसेच नवी मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अचानक निधनाने पोलिस दलात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि सहकाऱ्यांना मनापासून शोक व्यक्त करतो. या उत्कृष्ट अधिकाऱ्याच्या निधनाने मुंबई पोलिस दल दुःखी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.