
Maharashtra Water Crisis: यंदा एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रात पाणीसंकट निर्माण झालंय. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 38 टक्क्यांवर आलाय. अजून उन्हाला संपायला अनेक दिवस बाकी आहेत. त्याआधीच पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने सर्वांचीच चिंता वाढलीये.
पाणीसंकट दिवसेंदिवस आणखीनच गडद
महाराष्ट्रावरील पाणीसंकट दिवसेंदिवस आणखीनच गडद होत चाललंय. जागतिक तापमानवाढीमुळे सर्वोत मोठा फटका पाणीसाठ्याला बसतोय. उन्हामुळे बाष्पीभवन आणि वाढत्या मागणीमुळे पाणीसाठी दिवसेंदिवस कमी होत चाललाय. गेल्यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस होऊनही यंदा मात्र एप्रिल महिन्यातच जनतेच्या घशाला कोरड पडलीये. राज्यात एकूण 2 हजार 997 धरणं आहेत. त्यांची एकत्रित साठवण क्षमता 40 हजार 498 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या घडीला या धरणांमध्ये केवळ 38 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. गेल्या 15 दिवसांत जलसाठ्यात 5 टक्क्यांनी घट झालीये. विदर्भ आणि मराठवाड्यात तर अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झालीये.
कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा?
कोकणामध्ये 44.37 %, पुण्यामध्ये 30%, नाशिकमध्ये 40%, मराठवाड्यामध्ये 35.82%, अमरावतीमध्ये 46%, नागपूरमध्ये 37.55% पाणीसाठी शिल्लक आहे. पुणे विभागात सर्वात कमी म्हणजेच केवळ 30 टक्के पाणीसाठा आहे. सध्या राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 447 गावं आणि 1327 पाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या टँकरच्या मागणीतही वाढ होतेय. अनेक भागांमध्ये घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागतेय. तहान भागवण्यासोबतच शेती जगवण्याचंही मोठं आव्हान शेतक-यांसमोर उभं ठाकलंय.
धरणांमधील पाणीसाठ्याचं योग्य नियोजन नाही
धरणांमधील पाणीसाठ्याचं योग्य नियोजन न झाल्याने एप्रिल महिन्यातच जलसाठा आटल्याचा आरोप होतोय. मात्र पाण्याचं नियोजन करण्यात आल्याचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
पाणी जपून वापरण्याचं आवाहन
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यातील पाणीसाठ्याची परिस्थिती चांगली आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे पाणीसाठयात होणारी घट ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.