
Bhiwandi Crime News : उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं (यूपी एटीएस) शनिवारी उशिरापर्यंत छापेमारी करत भिवंडीतील विविध भागातून 3 तरुणांना अटक केली आहे. या तरुणांनी अंदाजे 3 लाख रुपये गोळा करून ती रक्कम फिलिस्तीन देशात पाठवल्याचा आरोप आहे. या तिघांवर संशयास्पद कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (२२ वर्षे, रा. सहारा अपार्टमेंट्स, ताहेरा मॅरेज हॉलजवळ, भिवंडी ) अबू सुफियान तजम्मुल अन्सारी (२२ वर्षे, रा. गुलजार नगर, भिवंडी ) जैद नोटियार अब्दुल कादिर (२२ वर्षे रा. वेताळ पाडा, भिवंडी) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. भिवंडीतून उत्तरप्रदेश राज्यात लाखाची रक्कम फिलिस्तीन (पॅलेस्टाईन) देशात पाठवली जात असल्याचं तपासात समोर आलं होतं. त्यानंतर शुक्रवारी भिवंडीत दाखल झालेल्या यूपी एटीएसच्या एक पथकानं तपास सुरू केला.
दिवसभर या तरुणांवर पाळत ठेवून शनिवारी दुपारच्या सुमारास भिवंडी शहरातील गुलजार नगर भागातील एका इमारतीत पथकान अचानक छापेमारी केली. यावेळी पथकानं अबू सुफियान तजम्मुल अन्सारी या तरुणाला राहत्या घरातून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्याकडं चौकशी केली असता त्यानं इतर दोन साथीदार मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन आणि जैद नोटियार अब्दुल कादिर या दोघांची नावे सांगितली. पथकानं दोघांनीही शांतीनगर आणि निज्मापुरा पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं. त्यांच्यावर रक्कम गोळा करून दहशतवाद्यांना विदेशांना पाठविल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला.
शनिवारी, रात्री उशिरा या तिन्ही तरुणांना उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं पुढील तपासासाठी लखनौच्या एटीएस कार्यलयात नेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्याच आठवड्यात अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका परिसरामधून आफताब कुरेशी या संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अटक केली होती. त्यावेळीही स्थानिक हिल लाईन पोलिसांकडून आफताबचं घर शोधून काढण्यात आलं. त्याला अटक करून दिल्लीत पुढील तपासासाठी नेण्यात आलं. आता, त्या पाठोपाठ भिवंडीतील या तिघांवर देशविघातक संशयास्पद कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
गेल्या दोन वर्षापूर्वी नवरात्री आणि दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सर्तक होऊन ठिकठिकाणी छापेमारी करीत होते. त्यावेळी देशविघातक आणि दहशतवादी कृत्यांना अर्थसहाय्य केल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेच्या 3 पदाधिकाऱ्याना भिवंडी शहरातून ताब्यात घेण्यात आले. ठाणे एटीएसच्या अधिकाऱ्यांसह विविध गुन्हे शाखेच्या पथकानं त्यांना सापळा रचून ताब्यात घेतलं होतं. तर भिवंडी तालुक्यातील पडघा गावाच्या हद्दीतून आयसीसीच्या आठ ते दहा दहशतवाद्यांना काही महिन्यापूर्वीच अटक करण्यात आली होती. एकंदरीतच भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात दहशतवाद्यांसह पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्यासह देश विघातक कारवाईचं कनेक्शन उघड झालं आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासह मुंबईच्या सुरक्षेच्या दुष्टीनं ही बाब धोक्याची असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.