
Hingoli Maharashtra News Today: मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात महिलांच्या आरोग्य तपासणीदरम्यान संपूर्ण आरोग्य यंत्रणेला खडबडून जागा करणारा अहवाल समोर आला आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या संजीवनी अभियानाचा हादरवून टाकणारा अहवाल समोर आला असून या अहवालानुसार तब्बल 13 हजार 956 महिला कर्करोग संशयित असल्याचे दिसून आले आहे. या महिलंची आरोग्य विभागाकडून तालुकास्तरावर स्क्रिनींग केली जाणार असून त्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केले आहे.
3 लाखांपेक्षा अधिक महिलांची माहिती गोळा केली
संजीवनी अभियानासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन या अभियानात नेमके काय करायचे याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली होती. त्यानंतर आशा कर्मचाऱ्यांमार्फत गावपातळीवर महिलांची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जागतिक महिला दिनापासून म्हणजेच 8 मार्चपासून गाव पातळीवर महिलांच्या भेटी घेऊन त्यांची आरोग्य विषयक माहिती घेण्यात आली आहे. यामध्ये कर्करोग संशयित महिलांची माहिती घेण्यात आली आहे. अभियान सुरु झाल्यानंतर ते 20 दिवस म्हणजेच 27 मार्चपर्यंत सुरु होतं. या सर्वेक्षणात तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक महिलांची माहिती गोळा करण्यात आली आहे. या तपासणीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल 13 हजार 956 महिलांना संशयित कर्करोग असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
तपासणी शिबीर घेतलं जाणार
या अभियानामधून समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीमुळे हादरून गेलेल्या आरोग्य विभागाने तालुकास्तरावर तपासणी शिबीर घेण्याची तयारी सुरु केली आहे. यामध्ये तालुकास्तरावर महिलांची स्क्रिनींग केली जाणार असून त्यातून कर्करोग आढळून आलेल्या महिलांची माहिती घेतली जाणार आहे. उपचारांची गरज असलेल्या माहिलांवर औषधोपचार केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले आहे.
तोंडाचा, गर्भाशयाचा आणि स्तनांचा कर्करोग
आता या शिबीरातून किती महिलांमध्ये कर्करोगाचे निदान होते याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात आरोग्य तपासणीमध्ये 3733 संशयित महिला रुग्णांमध्ये तोंडाचा कर्करोग असल्याचे दिसून आले आहे. 7524 महिलांमध्ये गर्भायश संशयित कर्करोगाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर 2699 महिलांमध्ये स्तनाचा संशयित कर्करोग असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.