
Maharashtra Politics News: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसनं स्वबळाचे संकेत दिलेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तसं वक्तव्य केलंय…त्यामुळे काँग्रेसच्या एकला चलोच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे पक्षानंही आपली भूमिका मांडली आहे. पाहुयात.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसनं स्वबळाचे संकेत दिलेत. संपूर्ण राज्यभर मविआ म्हणून एकत्र लढणं शक्य नाही. स्थानिक पातळीवरील काँग्रेस युनीट याबाबत निर्णय घेणार, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला आम्ही मविआ म्हणून सामोरे गेलो. मात्र आता युती-आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल, असं सपकाळ यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेसनं स्वबळाची भाषा केल्यानंतर आता भाजपमधूनही त्यावर प्रतिक्रिया समोर आलीय. काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.
तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही सपकाळ यांच्या सुरात सूर मिसळलाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आमचं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी बोलणं झाल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानंही स्वागत केलंय. युती किंवा आघाडीबाबतचा निर्णय हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलंय. मात्र त्याचवेळी वेळ पडलीच तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचीही स्वबळाची तयारी असेल, हे सांगायलाही प्रवक्ते प्रशांत जगताप विसरले नाहीत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. राज्यातल्या सर्वच जागांवर मविआ म्हणून एकत्र लढणं शक्य नसल्याचं पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे काही जागांवर स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील हे स्पष्ट झालंय.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला महायुती एकत्र सामोरं जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी याआधीच स्पष्ट केलंय. अर्थात सर्वच ठिकाणी युती शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्याच धर्तीवर मविआनंही आपली भूमिका स्पष्ट केलीय…लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे सर्वच ठिकाणी युती शक्य नसल्याचं महायुतीसह मविआचंही जवळपास एकमत झाल्याचं चित्र आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.