
येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणार असल्याने, महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती कामांना वेग आला आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज उपकेंद्रांतील आणि वीजवाहिन्यांवरील यंत्रणेची दुरुस्ती केली जात आहे. या कामांसाठी शुक्रवारी अनेक भागांत वीजपुरवठा खंडित करून दुरुस्ती करण्यात आली. पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी, वीजपुरवठा खंडित होणे टाळण्यासाठी आणि विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी ही कामे प्रामुख्याने दर शुक्रवारी केली जातात. ग्राहकांना याची पूर्वसूचना दिली जाते. महापारेषण आणि महावितरणच्या समन्वयातून ही कामे सुरू आहेत. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे ग्राहकांना वीज बंद होण्याबाबत कळवले जाते, तसेच बाधित क्षेत्रांत पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाते. या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती कामांमध्ये वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, तुटलेले पिन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉप-अप करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले खांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई, इन्सुलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉप-अप यांसारखी विविध कामे केली जात आहेत. शुक्रवारी (१० एप्रिल) विविध ३३ केव्ही उपकेंद्रांत व त्यावरील वाहिन्यांवर नियोजित देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली. खाजगी किंवा विविध संस्थांच्या मालकीच्या जागेतील झाडांच्या मोठ्या फांद्या वादळ व मुसळधार पावसामुळे कुंपणाबाहेरील वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी, संबंधित मालकांनी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेऊन किंवा त्यांच्या मदतीने अशा झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असेही महावितरणकडून कळवण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






