
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राज्यभर प्रचाराचा धुराळा उडत आहे. अजित पवारही पक्षाला घवघवीत यश मिळावं यासाठी ठिकठिकाणी सभा घेत आहेत. गुरुवारी अजित पवार फुरसुंगी, उरुळी देवाची येथे पोहोचले असता, तेथील रस्त्यांची स्थिती पाहून नाराजी व्यक्त केली. रस्त्यांची स्थिती पाहून पालकमंत्री म्हणून मलाच माझी लाज वाटली अशी कबुलीही त्यांनी दिली. सभेत अजित पवारांनी वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या कोंडीवर भाष्य केलं.
“फुरसुंगी, उरुळी देवाची भागात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. तुमच्या भागातले काय रस्ते आहेत. खरंच सॅल्यूट तुम्हाला…कसं सहन करता तुम्ही हा ञास…!!! रस्त्यांची अवस्था पाहून पालकमंत्री म्हणून मला लाज वाटली,” असं अजित पवार म्हणाले आहेत.
“फुरसुंगी नगरपरिषदेचं नगराध्यक्ष पद हे मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने मी माझा युवा कार्यकर्ता संतोष सरोदेला उमेदवारी दिली आहे. तर 16 प्रभागात 32 उमेदवार रिंगणात आहेत. मित्रांनो खरंतर फुरसुंगी, उरूळी देवाची पुणे मनपात आम्ही समाविष्ट केली होती, त्यामागे उद्देश्य हाच होता की, निधी जास्त मिळेल आणि या गावांचा विकास होईल. पण मध्यंतरी इथं पुन्हा नगरपरिषद मंजूर झाली आणि आज ही निवडणूक लागली. पण गावची परिस्थिती काय? रस्ते प्रचंड खराब आहेत. उरूळी देवाची गावचा रस्ता एवढा खराब झालाय की सांगायची लाज वाटते. पण काही लोकांनी टँक्सचं कारण देऊन इथं नगरपरिषद आणली आणि तेव्हा आश्वासन दिलं की 300 कोटी आणतो. मला सांगा आले का?…नाही ना,” असा टोला अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे विजय शिवतारे यांना लगावला.
फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. संतोष फकीरा सरोदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं.
फुरसुंगी-उरुळी देवाची परिसराचा सर्वांगीण विकास हा आमचा… pic.twitter.com/8tmHyAkgc8
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 27, 2025
“मिञांनो या भागाचा विकास करायचा असेल तर स्वतंत्र महापालिकाच निर्माण करावी लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. पूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकासुद्धा नगरपालिका होती. त्यानंतर वाढत्या लोकसंख्येमुळे पिंपरी चिंचवड महापालिका झाली. आज त्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. याही नगरपरिषदेचा विकास आपण करु,” असा शब्द अजित पवारांनी दिला आहे.
उरुळी देवाची फाटा ते उरुळी गाव रोड दरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माता-भगिनींनी माझ्यावर केलेला प्रेमाचा वर्षाव, दाखवलेला विश्वास, दिलेले आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे..!
फुरसुंगी pic.twitter.com/KaHtZDwv8h
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 27, 2025
“मी शब्दाचा पक्का आहे. या नगरपरिषदेला मी निधी मिळवून देणारच. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी हडपसर आणि नगर रोडला उड्डाणपूल हे उभारावेच लागतील. तुमच्या भागातले काय रस्ते आहेत. खरंच सलाम तुम्हाला.कसं सहन करता तुम्ही हा ञास?,” अशी विचारणा अजित पवारांनी केली.
“संतोष आता जरा जाडजूड दिसतोय पण नगराध्यक्ष होऊ द्या. मग बघ तुला कसं पळावं लागेल…आपोआप बारिक होशील. मिञांनो पुढारीपण सोपं नाही…फाट फाट फाटती…ज्याचं त्यालाच माहिती. होय, माझ्यात धमक हे म्हणूनच बारामतीचा विकास करून दाखवला आहे. मला आता महाराष्ट्र घडवायचाय, म्हणून तुमची साथ हवी आहे,” अशी हाकही त्यांनी दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



