
माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात आंदोलनाला बसले आहेत. आमची अंत्ययात्रा निघाली तरी बेहत्तर पण आम्ही मागे हटणार नाही
.
राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळावा, यासोबतच शेतात पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत व्हावी, सरकारने मच्छीमार आणि मेंढपाळ आणि दूध उत्पादकांसाठी विशेष धोरण लागू करावे. यासोबतच ग्रामीण भागात घरकुलाची किंमत वाढून द्यावी, अशा मागण्या बच्चू कडू यांनी केल्या आहेत.
नेमके काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू म्हणाले, भरकटलेली व्यवस्था सुधारण्यासाठी मी आंदोलनाला बसलो आहे. माझा बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहिला पाहिजे, अशी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. माझा शेतकरी राजा बाप जिवंत राहिला पाहिजे. सोयाबीन आधी सहा हजारावर होते, ते चार हजारावर गेले. तुरीचे भाव एक हजाराने कमी झाले पण तरीही कुणी पेटून उठत नाही. कारण देशात अंतर्गत झुंजी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आमच्या डोक्यात हिंदू मुस्लीम वाद पेरण्याचा प्रयत्न
देशात सध्या कोणत्याही विषयावरून जातीय रंग देऊन भांडणे लावण्याचा उद्योग सुरू आहे. राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद पेटवला गेला. त्यामुळे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न मागे पडत चालला आहे. आमच्या डोक्यात हिंदू मुस्लीम वाद पेरण्याचा प्रयत्न आहे. त्यावर रामबाण उपाय म्हणजे बच्चू कडू यांचे आंदोलन आहे. वेळ आली तर बच्चू कडू बलिदान करायला तयार आहे पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.
सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली
सरकारी पैशांनी बहिणींची मते विकत घेतली. पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडले आहेत. सरकार सत्तेवर यावे यासाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली. त्याच काळात मात्र शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पडला होता. सरकारला माहीत आहे की बच्चू कडू मेला तरी फ़रक पडत नाही. कारण त्यांनी जाती धर्मात लोकांना गुंतवणूक ठेवले आहे, अशी टीकाही बच्चू कडू यांनी सरकारवर केली.
आंदोलनाला बसण्यापूर्वी काढली मिरवणूक
बच्चू कडू यांनी आंदोलनाला बसण्यापूर्वी ट्रॅक्टरवरून मिरवणूक काढली होती. त्याआधी त्यांनी रविवारी दुपारी शहरातील संत गाडगेबाबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यानंतर ते ट्रॅक्टर ट्रॉलीवर स्वार झाले. त्यांच्या ट्रॅक्टरमागे शेकडो कार्यकर्ते दुचाकीवर स्वार होऊन मिरवणुकीत सहभागी झाले. पंचवटी चौक, इर्वीन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.