
.
कळवण तालुक्यातील मानूर येथे राजस्थानमधील बंछीपहाड प्रकारातील लाल दगडात नागर शैलीतील ५१ फूट उंचीचे भव्य गुरुदत्त मंदिर उभारण्यात आले आहे. सुमारे साडेआठ हजार क्युबिक फूट म्हणजेच जवळपास ५०० टन दगड वापरून बांधलेल्या या मंदिरात नैसर्गिक तापमान नियंत्रणाची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली असून चौरशीसाठी ७ देशांतील दगडांचा वापर केला आहे.
हे मंदिर गुरुदत्त शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. जे. डी. पवार आणि महिला बँकेच्या संस्थापक मीनाक्षी पवार यांनी स्वखर्चाने संस्थेच्या आवारातील १ एकर जागेत उभारले आहे. सर्वांसाठी खुले असलेल्या या प्राचीन शैलीतील मंदिराकडे भाविकांची गर्दी वाढत आहे. प्राचीन मंदिरांतील कलाशैली आपल्या तालुक्यात असावी, या संकल्पनेतून मीनाक्षी पवार यांना ही कल्पना सुचली. त्या संकल्पनेला डॉ. पवार यांनी मूर्त रूप दिले. मंदिर उभारणीचे काम राजस्थानमधील १० कुशल कारागिरांनी केले असून अडीच वर्षांत बांधकाम पूर्ण झाले. दगडी बांधकामामुळे हवामानानुसार मंदिरातील तापमान संतुलित राहते, त्यामुळे आतमध्ये थंडावा आणि प्रसन्नता कायम टिकून राहते. मानुर परिसरात उभे राहिलेले हे मंदिर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
नागर शैलीतील या मंदिरात मकराना दगडातील ५१ इंचाची गुरुदेव दत्ताची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कुठल्याही ऋतुमानात ही मूर्ती अतिशय थंड असते.
धर्मसंस्कृतीचा प्रचार-प्रसार होईल
^संस्थेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हिंदू धर्म परंपरेनुसार गुरुजनांसोबत गुरुदेव दत्ताचे दर्शन घेता यावे. अभ्यासातील ताणतणाव आल्यास मंदिर परिसरात बसून ध्यानधारणा करता यावी. तसेच गुरुदत्त भूमीमध्ये दत्ताची पूजा अर्चा व्हावी या उद्देशाने मंदिर बांधण्यात आले आहे.
-डॉ. जे. डी. पवार, संस्थापक, गुरुदत्त शिक्षण संस्था
दि. २२ ते २५ मार्च दरम्यान मंदिराचा कलशारोहण सोहळा आणि गुरुदत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



