
Devendra Fadnavis On Meeting Dhananjay Munde: राज्यातील मंत्रिमंडळामध्ये अचानक गुरुवारी सायंकाळी खांदेपालट करण्यात आला. आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेले आणि थेट विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षाचे नेते माणिकराव कोकाटेंची उलचबांगडी करत त्यांच्या जागी कृषीमंत्रीपद दत्ता भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेताना काही महिन्यांपूर्वी पदावरुन बाजूला करण्यात आलेले मंत्री धनंजय मुंडेंचा विचार केला की नाही याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.
अजित पवारांनी दिलेले सूचक संकेत
काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी मुंडेंच्या नावासंदर्भात सकारात्मक संकेत दिले होते. त्यामुळे कृषीमंत्रीपदी धनंजय मुंडेंची वर्णी लागते की काय अशी चर्चा दबक्या आवाजात होती. मात्र भरणेंच्या माध्यमातून अगदीच वेगळा पर्याय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निवडल्याचं दिसत आहे. मात्र धनंजय मुंडेंची ही न झालेली निवड चर्चेत असतानाच त्याबद्दल फडणवीसांनी सूचक विधान केलं आहे.
खातेपालट का? फडणवीसांनी सांगितलं
आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी खांदेपालट कसा झाला यासंदर्भातील माहिती दिली. “जी घटना घडली त्यासंदर्भात मोठा रोष होता. त्यासंदर्भात अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी मिळून चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कोकाटे यांचं खातं बदललं आहे. त्यांना दुसरं खातं देण्यात आला आहे. कृषी खातं मामा भरणे यांना देण्यात आलं आहे. आता तरी कुठला दुसरा बदल होईल अशी कोणतीही चर्चा नाही,” असं फडणवीस यांनी सांगितलं.
नक्की वाचा >> ‘कोणीही बेशिस्त वर्तणूक केली तर…’; कृषीमंत्री बदलल्यानंतर फडणवीसांचा इशारा; शिंदे-पवारांचं घेतलं नाव
धनंजंय मुंडेंच्या भेटीबद्दल फडणवीसांचं सूचक विधान
धनंजय मुंडे आणि तुमची दोनदा भेट झाली आहे, असं म्हणत पत्रकारांनी कृषीमंत्रीपदाची संधी मुंडेंना का देण्यात आली नाही असा प्रत्यक्ष प्रश्न फडणवीसांना विचारला. थेट उल्लेख न करता विचारण्यात आलेला हा प्रश्न फडणवीसांना कळला. त्यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवताना, “तुमची माहिती अर्धवट आहे. त्यांनी तीन वेळेला माझी भेट घेतली आहे. ती वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झाली नाही,” असं उत्तर दिलं. पुढे बोलताना फडणवीसांनी 2 वाक्यांमध्ये मुंडेंच्या संभाव्य मंत्रिपदाचा विषय उडवून लावला. “मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या पातळीवर होत नाही. मंत्रिमंडळाची चर्चा मी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर होते,” असं फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.