
पुण्यातील मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र बाणेर येथे स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची मागणी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. हवाई वाहतूक तज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी ही मागणी केली असून, पूर्व पुणे परिसरातील वाढती लोकसंख्या, आयटी कंपन्यांची उपस्थिती आणि पासपोर्ट सेवांची सातत्याने वाढणारी मागणी लक्षात घेता, मुंढवा केंद्र कायम ठेवणे अधिक योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. रांजणगाव, केसनंद, बकोरी, खराडी, मगरपट्टा, हडपसर, मुंढवा, विमाननगर, कोरेगाव पार्क आणि कल्याणी नगर यांसारख्या पूर्व पुण्यातील भागांमध्ये आयटी उद्योग, विविध विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) आणि औद्योगिक प्रकल्प मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. या परिसरात लाखो कर्मचारी, व्यावसायिक आणि उद्योजक वास्तव्यास असून, त्यांना परदेश प्रवासासाठी नियमितपणे पासपोर्टची आवश्यकता असते. याशिवाय, अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमुळे दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. प्रस्तावित बाणेर येथील केंद्र पूर्व पुण्यातील नागरिकांसाठी तुलनेने दूर आहे. वाहतुकीच्या गर्दीच्या वेळेत तेथे पोहोचण्यासाठी दीड ते दोन तास लागू शकतात. यामुळे नागरिकांना प्रवासात वेळ, खर्च आणि गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो, असे वंडेकर यांनी स्पष्ट केले. पुण्याचा झपाट्याने विस्तार होत असताना, मुंढवा येथील सध्याच्या केंद्राची क्षमता आणि सुविधा वाढवणे हा अधिक व्यवहार्य आणि जनहिताचा निर्णय ठरू शकतो. यामुळे नागरिकांना सुलभ सेवा मिळेल आणि अनावश्यक प्रवास टाळता येईल. या पार्श्वभूमीवर, पुण्याच्या लोकप्रतिनिधींनी या विषयात हस्तक्षेप करून नागरिकांच्या सोयीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



