digital products downloads

मुंबईच्या वेशीवर MHADA ची नवी घरं! Lottery च्या तारखा, वेळापत्रक जाहीर; 5285 घरांची सोडत

मुंबईच्या वेशीवर MHADA ची नवी घरं! Lottery च्या तारखा, वेळापत्रक जाहीर; 5285 घरांची सोडत

MHADA Konkan Board Lottery 2025: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5 हजार 285 सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग),  कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली आहे. सदर सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत सोमवार, दिनांक 14 जुलै, 2025  रोजी दुपारी एक वाजता  ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

कोणकोणत्या सदनिका विक्रीसाठी उपलब्ध

कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 565 सदनिका, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत 1677 सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (50 टक्के परवडणार्‍या सदनिका) 41 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

अर्जासंदर्भातील महत्त्वाच्या तारखा कोणत्या?

सदर सोडतीसाठी दि. 13 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. दिनांक 14 ऑगस्ट, 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 21 ऑगस्ट, 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता ‘म्हाडा’च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी दिनांक 1 सप्टेंबर, 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 

कुठे निघणार सोडत?

दिनांक 3 सप्टेंबर, 2025  रोजी सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाणार आहे. अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे. 

कसं नोंदवता येणार लॉटरीसाठी नाव

कोकण मंडळाच्या संगणकीय सोडतीमध्ये IHLMS 2.0 संगणकीय प्रणाली व ऍपच्या साहाय्याने अर्ज नोंदणी प्रक्रियेस 14 जुलै, 2025 रोजी दुपारी 1 वाजेपासून सुरवात होणार आहे. सोडतीत सहभाग घेण्याकरिता अर्जदार IHLMS 2.0 ही सोडतीची संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android)अथवा आयओएस (ios)या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमच्या साहाय्याने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतात. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहितीपुस्तिका, ध्वनीचित्रफिती, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी केले आहे. सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्‍या अडचणीचे निराकरण करण्यासाठी 022 – 69468100 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.  

कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास नाही

श्रीमती गायकर यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून यामध्ये कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोंकण मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही.  तसेच त्यांनी आवाहन केले आहे की सोडत प्रक्रियेमध्ये म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सहभाग घ्यावा.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp