
BMC Elections 2026 Result : शुक्रवार 16 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहिली असून येथे महायुतीला मुंबईकरांनी मोठं यश दिलं आहे. बातमी लिहीपर्यंत भाजपला 88, शिवसेना शिंदे पक्षाला 25, उबाठाला 65 जागा, मनसे 6 जागा, काँग्रेस 23, एमआयएम 9 जागा मिळाल्या आहेत. अशातच भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला सुद्धा यंदाच्या निवडणुकीत यश मिळालं आहे.
प्रभाग क्रमांक 25 मधून लढवली निवडणूक :
अभिनेत्री निशा परूळेकर ही आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टी, नाटक इत्यादींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अभिनेत्री निशा परूळेकर हिला प्रभाग क्रमांक 25 कांदिवली/ ठाकूर व्हिलेज परिसरामधून भाजपकडून उमेदवारी मिळाली होती. शुक्रवारी हाती आलेल्या निकालांच्यानुसार प्रभाग क्रमांक 25 मध्ये निशा हिला घवघवीत यश मिळालं असून तिने ठाकरेसेनेचे उमेदवार योगेश भोईर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे.
राजकारणात सक्रिय होती अभिनेत्री :
अभिनेत्री निशा परुळेकर या राजकारणात पूर्वीपासून सक्रिय होत्या. मनोरंजनसृष्टीत कार्यरत असलेल्या निशा यांचे पूर्वीपासूनच राजकीय संबंध होते. भाजपचे विधानपरिषद आमदार आमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जायच्या, या कारणामुळेही निशा परुळेकर यांना प्रभाग क्रमांक 25 कांदिवली/ ठाकूर व्हिलेज परिसरामधून उमेदवारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे. सुरुवातीला अभिनेत्रीला उमेदवारी का देण्यात आली यासंदर्भात कार्यकर्त्यांमध्ये काहीसा असंतोष होता, मात्र उमेदवारी जाहीर झाल्यावर निशा परुळेकर यांनी घराघरात जाऊन भाजपचा प्रचार केला. अखेर मुंबई महापालिकेवर त्या नगरसेवकी म्हणून निवडून गेल्या आहेत.
हेही वाचा : BMC Election Result 2026 : 22 महापालिकांमध्ये शून्य अन् मुंबईत दहाचा आकडा पार करताना मनसेची दमछाक
निशा परुळेकरांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द :
निशा परुळेकर यांचा 19 सप्टेंबर 1974 रोजी मुंबईत झाला. त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण एएफएसी इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केलं तर चेंबूर येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतले. त्यांनी अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. अभिनेत्री निशा परुळेकर यांनी परीस, जन्ममंत्र, दंडित, प्राइम टाइम, ये रे ये रे पैसा, हरि ओम विठ्ठला, माहेर ही वाट आणि इतर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निशा 23 मार्च 2012 रोजी प्रदर्शित झालेल्या तीन बायका फजिती ऐका या मराठी विनोदी चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



