
वक्फ सुधारणा विधेयक आणत 2 लाख कोटी रुपयाच्या जमीनी यांना खायच्या आहे. वक्फच्या जागेवर मुंबईत अनेक उद्योगपतींचे अलिशान बंगले उभे आहेत, हिंदुत्वाच्या नावाने त्यांना जमीनी ताब्यात घ्यायच्या आहेत, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
.
संजय राऊत म्हणाले की, 2014 ते 2024 मध्ये देशातील सर्व संपत्ती उद्योगपतींना विकून झाली. मग वक्फच्या जागेवर त्यांचे लक्ष गेले आणि ते विकायचे ठरवले, म्हणून आम्ही जे देश विकल्याची टीका करतो ती खोटी नाही. देश विकून झाल्यावर आता वक्फची संपत्ती दिसली आणि त्यांनी विधेयक आणले.
हिंदू-मुसलमान असा खेळ केला
संजय राऊत म्हणाले की, वक्फ सुधारणा विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध काय? मुसलमानांच्या संपत्तीवर सरकारी नियंत्रण आणण्यासाठी मोदी सरकारने हे विधेयक आणले. हे सरळ प्रॉपर्टी वॉर आहे. यात हिंदू-मुसलमानांचा प्रश्न कसला? वक्फ बोर्डाकडे साधारण सव्वादोन लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यात मोक्याच्या जमिनी आहेत. 2010 मध्ये लालू यादव म्हणाले होते, वक्फ बोर्ड सरकारी जमिनींचा कब्जा घेत आहे. वक्फच्या विरोधात कठोर कायदा बनवायला हवा. तेव्हा मनमोहन सिंगांचे सरकार होते. आता मोदी-शहांचे आहे. या सरकारने हे बिल आणून नेहमीप्रमाणे हिंदू-मुसलमान असा खेळ केला.
वक्फची संपत्ती पाहून विधेयक
संजय राऊत म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी हिंदू आणि मुसलमानांचा वाद पेटवायचा व आपले काम साधून घ्यायचे. वक्फच्या माध्यमातून तेव्हा जमिनी हडपणारे दुसरेच लोक आहेत व आता वेगळे लोक आहेत. भाजपाने हे विधेयक वक्फची अफाट संपत्ती डोळ्यासमोर ठेवून आणले. सामाजिक सुधारणा, जनसेवा, गरीब मुसलमानांचे हित वगैरे झूठ आहे!
संघाने बाटग्यांचे चिंतन शिबीर घ्यावे
संजय राऊत म्हणाले की, फडणवीस माणसे वापरून घेतात व सोडून देतात. याचा अनुभव अनेकांना येत आहे. हिंदुत्वाच्या विषयावर गोंधळाचे चित्र निर्माण झाले. अशोक सिंघल यांच्यानंतर विश्व हिंदू परिषद दिशाहीन झाली व अयोध्येत राम मंदिर उभे राहिल्याने जणू विश्व हिंदू परिषदेकडे काम उरले नाही. बजरंग दलाची अवस्था शिंदे गटासारखी झाली. त्यामुळे हिंदुत्वाच्या बाबतीत दिशादर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकांकडेच पाहावे लागेल. भाजपाचे हिंदुत्व उठवळ आणि व्यापारी पद्धतीचे आहे व ते वरवरचे आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी हिंदुत्वाचा कार्यक्रम जाहीर केला, पण वक्फ बोर्डाच्या नव्या विधेयकावर ते बोलले नाहीत. पण होसबाळे यांनी जे विचार मांडले ते महत्त्वाचे. होसबाळे म्हणाले, धर्मांतरण, गोहत्या, लव जिहाद या आव्हानांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अयोध्या आंदोलनाच्या वेळी विश्व हिंदू परिषद आणि आमच्या धर्मगुरूंनी तीन मंदिरांवर भाष्य केले होते. वाराणसीत विश्वनाथ मंदिर आणि मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमी. स्वयंसेवकांनी या मंदिरांसंदर्भात काही प्रयत्न व कार्य सुरू केले तर त्यांना संघ थांबवणार नाही. मुस्लिम आक्रमकांनी मथुरेत श्रीकृष्ण मंदिर आणि वाराणसीत काशी विश्वनाथ मंदिरावर हल्ला केला. ते उद्ध्वस्त केले व त्यावर मशीद बांधली. होसबाळे यांनी कोणतीही लपवाछपवी न करता ही भूमिका मांडली. ती अत्यंत संयमी आहे, पण पुढे जाऊन होसबाळे यांनी सांगितले ते महत्त्वाचे. आता मशिदी खोदून मंदिरे शोधण्याचे उद्योग सुरू आहेत. ते निरर्थक आहेत. भूतकाळातले खड्डे उकरून काय मिळणार? मशिदीच्या खोदकामामुळे समाजात शत्रुत्व निर्माण होईल आणि महत्त्वाची सामाजिक परिवर्तनाची कामे त्या खड्ड्यात जातील. मुख्य म्हणजे, तुम्ही किती मशिदी आणि पुरातन इमारतींचे खोदकाम करणार? 30 हजार मशिदी आहेत. त्या खोदणार? इतिहास बदलण्याचा हा प्रयोग का करायचा? इतिहास किती मागे घेऊन जाणार? समाजातले शत्रुत्व आणि आक्रोश वाढत गेले तर महत्त्वाच्या कार्यावरचे लक्ष विचलित होईल. भूतकाळात अडकून चालणार नाही. होसबाळे यांनी मांडलेल्या भूमिकांचे भारतीय जनता पक्षातील बाटग्यांनी चिंतन केले पाहिजे. खरे तर संघाने या सर्व बाटग्यांचे एक चिंतन शिबीर घेतले पाहिजे, तरच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व हातात हात घालून पुढे जातील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.