
मुंबईतील दहिसर परिसरातील JBNC इंटरनॅशनल स्कूलला स्फोटाची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळच्या सुमारास शाळा प्रशासनाला हा संदेश प्राप्त होताच त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती समोर येताच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले, तर परिसरात तणाव जाणवू लागला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शाळा प्रशासनाने तातडीने आवश्यक ती खबरदारी घेतली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातही या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर बंदिस्त केला. शाळेभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभी करण्यात आली. तपास पथकांनी शाळेची इमारत तसेच आसपासचा परिसर सखोलपणे तपासण्यास सुरुवात केली. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळू नये यासाठी बारकाईने पाहणी करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तपास यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाने तत्काळ सुट्टी जाहीर केली. पालकांना आपल्या मुलांना सुरक्षितरित्या घरी घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले. शाळा रिकामी करून तपास पूर्ण होईपर्यंत सर्व हालचालींवर निर्बंध ठेवण्यात आले. याचवेळी मुंबई उपनगरातील सुमारे बावीस ते पंचवीस शाळांना अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल मिळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ खोडसाळपणा आहे की, यामागे काही मोठा कट आहे, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिक आणि पालकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन केले आहे. सध्याची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील इतर शाळांभोवतीही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सर्व संबंधित यंत्रणा सतर्क असून प्रत्येक संदेशाची छाननी केली जात आहे. या घटनेमुळे शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



