
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीसांच्या एका कार्यक्रमात एकनाथ खडसे यांची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ही भेट झाली नाही.
.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे देखील दाखल झाले होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, गुलाबराव पाटील यांना स्थान होते. मात्र खडसे हे मंचासमोर असलेल्या व्हीआयपी कक्षात बसले होते. देवेंद्र फडणवीसांनी भाषणात खडसेंचे नाव घेणे देखील टाळले. केवळ समोर बसलेले मान्यवर असा उल्लेख करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
नेमके काय म्हणाले एकनाथ खडसे?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण मिळाले होते. कार्यक्रमाला येण्यासाठी आग्रहपूर्वक फोनही आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम असल्यामुळे मी उपस्थित राहिलो. खासगी कार्यक्रम असल्याने सर्वांनाच स्टेजवर स्थान देणे अपेक्षित नव्हते, असे एकनाथ खडसे म्हणाले.
…त्यामुळे व्यासपीठावर स्थान नाही
व्यासपीठावर न जाता व्हीआयपी कक्षात बसलात, याबाबत एकनाथ खडसेंना विचारले असता, या कार्यक्रमात मोजक्याच लोकांना स्टेजवर स्थान देण्यात आले. सर्वांना व्यासपीठावर स्थान द्यावे, अशी अपेक्षा नव्हती. व्यासपीठावर फक्त मंत्री आणि संघाचे प्रचारक होते. बाकीचे आमदार आणि मान्यवरांना समोर व्हीआयपी कक्षात बसवण्यात आले. हा शासकीय कार्यक्रम नव्हता. शासकीय कार्यक्रम असता तर सर्वांनाच व्यासपीठावर बसवले असते, असे एकनाथ खडसे म्हणाले.
फडणवीसांची भेट न झाल्याची खंत नाही
या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली नाही, याबाबत खडसेंना विचारले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी भेट होणार होती, हे खरे नाही. या कार्यक्रमात राजकीय चर्चा होईल, अशी अपेक्षा नव्हती. देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नाही, याची खंत नाही. त्यांची शांततेत अपॉइंटमेंट घेऊन मी केव्हाही भेट घेऊ शकतो, असे खडसे यांनी म्हटले.
मुख्यमंत्री आले, पण पदरात काहीच नाही
मंत्री किंवा मुख्यमंत्री या जिल्ह्यात येतात, तर या जिल्ह्यासाठी त्यांनी काहीतरी देऊन गेले पाहिजे. आमच्या पदरात काहीतरी मिळायला पाहिजे. एखादी मोठी घोषणा करायला हवी होती. एखादा प्रकल्प आला पाहिजे, एखादे विकासाचे काम आले पाहिजे. पण दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस ज्या-ज्या वेळी आले, त्या वेळेस आम्हाला निकाम्या हाताने परतावे लागले. मुख्यमंत्री आल्यानंतरही आमच्या जिल्ह्यासाठी काहीही पदरात पडले नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.