
Ghodbunder Road Traffic Update: गेल्या कित्येक वर्षांपासून घोडबंदर रोड येथील वाहतूक कोंडी वाढतच चालली आहे. ठाण्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं त्याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवरही होत आहे. अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर याचा ताण येतोय. त्यातीलच एक म्हणजे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी. तसंच, या परिसरात झपाट्याने विकास होत आहे. मोठमोठ्या इमारतींचे प्रकल्प उभे राहत आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून विविध प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहेत. घोडबंदर रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी सरकारने मास्टर प्लान आखला आहे. येथे अनेक प्रकल्पांची जोडणी देण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रो मार्गिका 4 (Mumbai Metro Line 4)
मुंबई मेट्रो मार्गिका ही उन्नत मार्गिका असून या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. अलीकडेच एमएमआरडीएने यासंदर्भातील एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या मेट्रो मार्गिकेमुळं वाहतुकीचा वेळ 75 टक्कांनी कमी होणार आहे. तर, या मार्गिकेवर 30 उन्नत स्थानके आहेत. यातील कापूरबावडी येथे मेट्रो मार्गिका 5चा इंटरचेंज असेल.
घोडबंदर रोडचे विस्तारीकरण
घोडबंदर रोडचा विस्तारचा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. घोडबंदरच्या रस्त्याचे रुंदीकरण करणार असून 7+7 असा एकूण 14 लेनचा हा मार्ग होणार आहे. या रस्त्याची नवी रचना 14 लेन असलेल्या काँक्रीट कॉरिडॉरमध्ये करण्याची योजना एमएमआरडीए आखत आहे.
बाळकुम-गायमुख कोस्टल रोड
घोडबंदर रोडला समांतर 13.44 किमी लांबीचा एक कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. 3,364 कोटी रुपयांच्या बजेटसह या 40-45 मीटर रुंदीच्या कॉरिडॉरमध्ये पूर्व-पश्चिम मार्गासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी व्हायाडक्ट आणि ओपन-कट विभाग असतील, ज्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल.
ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा जवळजवळ 12 किमी लांबीचा हा महत्त्वाकांक्षी बोगदा आहे. एकदा का बोगद्याचे काम पूर्ण झाले की, ठाणे आणि बोरिवली दरम्यानचा प्रवास फक्त10-15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
ठाणे-भाईंदरला जोडणारा बोगदा
गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शनपर्यंतचा 5.5 किमीचा बोगदा आणि मीरा-भाईंदरला जोडणारा 9.8 किमीचा उन्नत रस्ता या दुहेरी जोडणी प्रकल्पासाठी एमएमआरडीएला निविदा मिळाल्या आहेत. अंदाजे 20, 000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून यामुळं घोडबंदर रोडवरील गर्दी कमी होणार आहे.
पॉड टॅक्सी
मीरा-भाईंदर आणि ठाणे परिसरात 18 ठिकाणी पॉड टॅक्सी उभारणीसाठी एमएमआरडीएकडून डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. पॉड टॅक्सी ही कमी जागेत उभारली जाणारी व्यवस्था आहे. त्यानुसार या पॉडकारमध्ये 20 प्रवासी बसू शकतात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



